मुंबई/कोल्हापूर : गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूरमध्ये महापुराने थैमान घातले आहे. या पुराच्या पाण्यामुळे लाखो लोकांचे संसार बुडाले आहेत. या लोकांना अन्न धान्यापासून कपडेलत्त्याची गरज भासणार आहे. यामुळे राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. कोणी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत देतोय तर कोणी वेगवेगळ्या संस्थांना. राज्यसभेचे खासदार रामदास आठवले यांनीही कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला खासदार निधीतून विभागून मदत देऊ केली आहे. आज त्यांनी हैद्राबादमार्गे कोल्हापूरात येत पूरस्थितीची पाहणी केली.
कोल्हापूरमधील रांगोळी, कडोली, इंगळी, आंबेवाडी, जाधववाडी आणि कोल्हापूर शहर आदी भागांत आठवले यांनी पुरग्रस्तांच्या भेटी घेतल्या. त्याचप्रमाणे सांगली जिल्हयातील ब्रह्मनाळ गाव आणि परिसरातील पुरग्रस्तांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी आर्थिक सामाजिक आणि मानसिक पाठिंब्याची, मदतीची गरज आहे. या पूरग्रस्तांच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे असून सर्वांनी मिळून पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याचे; त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन आठवले यांनी केले.
यावेळी त्यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी; पुनर्वसनासाठी सांगली जिल्ह्याला 25 लाख आणि कोल्हापूर जिल्ह्याला 25 लाख असे एकूण 50 लाख रुपयांचा निधी खासदरनिधीतून देणार असल्याची घोषणा केली. तसेच राज्यातील अन्य आमदार, खासदारांनीही त्यांनी मदत देण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्रातील सर्व जण माणुसकीचे हात पुढे करीत असून पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अशावेळी कोणीही राजकारण न करता माणुसकी जिवंत ठेऊन मदतीसाठी पुढे यावे. तसेच अधिक चांगली मदत पूरग्रस्तांना होण्यासाठी शासनाला सूचना कराव्यात, असे आवाहन आठवले यांनी केले.