मुंबई : आगामी वर्षभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार असून, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. यासाठी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची लवकरच भेट घेणार असल्याचे रामदास आठवले यांनी यावेळी बोलताना सांगितले. (Ramdas Athawale declared that rpi will contest Assembly elections in five states)
आगामी वर्षभरात पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, पॉंडिचेरी येथील विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांकडून आत्तापासूनच तयारीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. येत्या वर्षभरात होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुका लढवणार असल्याचा निर्णय घेतला आहे. या पाचही राज्यात रिपाइंचे उमेदवार उभे करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मनमोहन सिंग यांचा GST कायदा का आणला नाही?; नाना पटोलेंची पंतप्रधानांना थेट विचारणा
शक्य तेथे भाजपला पाठिंबा
पाच राज्यातील विधानसभा निवडणुका लढवण्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार असून, रिपाइंला किमान तीन ते चार जागांवर तिकीट मिळावे, अशी मागणी करणार आहे. शक्य आहे, तेथे भाजपला पाठिंबा देऊ, असेही रामदास आठवले यांनी सांगितले.
मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा नाही
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली होती. मात्र, मुख्यमंत्रिपदाबाबत दोघांमध्ये चर्चा झालेली नाही. शिवसेना आणि आम्ही आधी एकत्र होतो. परंतु, आता शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या बिळात गेली आहे, असा चिमटा रामदास आठवले यांनी काढला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलकांबाबत जे वक्तव्य केले, त्याचा अर्थ चुकीचा घेतला गेला, असेही आठवले म्हणाले.