मुंबई: उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांची तशी इच्छा नव्हती. भाजपा आणि शिवसेनेत सत्तेतील अडीज-अडीज वर्षांचा वाटा ठरला होता, परंतू त्यांच्यात एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे जे व्हायला नको होते, ते झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तेत आली. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत. मित्र म्हणून अत्यंत साधाभोळा माणूस आहे, अशी स्तुतीसुमने केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर उधळली. परंतू त्यांनी एक सल्लाही दिला. (Ramdas Athawale gave suggestion to Uddhav Thackeray, Devendra Fadanvis, Sharad Pawar)
लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी रामदास आठवले यांची राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक मुलाखत घेतली. यावेळी रामदास आठवलेंनी आईच्या आठवणी सांगितल्या. राज्यातील राजकारणावर बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांना काही सल्ले दिले. तसेच आपल्याला आरपीआय स्वत:च्या हिंमतीवर आमदार, खासदार निवडून येतील असा उभारता आला नाही. यामुळे अनेकांना न्याय देता आला नाही, असे सांगत कार्यकर्त्यांची माफीदेखील मागितली आहे.
ज्या समाजासाठी मी लढलो, त्याच आपल्या लोकांनी माझ्यावर ठिकठिकाणी हल्ले केले. याचे मला आयुष्यभर वाईट वाटत राहील असे आठवलेंनी सांगितले. याचबरोबर उद्धव ठाकरेंना सल्ला देताना त्यांनी महायुतीत यावे, आणि फडणवीसांचे गीत गावे. फडणवीसांनी एक दिवस मातोश्रीवर जावे, आणि उद्धवजींना घेऊन यावे, अशी कविता केली. गो कोरोनासारखी माझी हाक 'कम उद्धवजी' अशी असेल, असेही त्यांनी सांगितले. तसेच देवेंद्र फडणवीसांना सल्ला देताना उद्धव ठाकरेंसोबत जुळवून घ्यावे, 2.5 वर्षे त्यांना द्यावे, अडीज आपण घ्यावे, असा सल्ला दिला.
शरद पवारांनी एनडीएत यावे...शरद पवारांना सल्ला देताना आठवले यांनी, शरद पवार आहेत माझे चांगले मित्र, समतेचे आहे त्यांच्यात चित्र. गोविंदरावांचे आहेत ते पूत्र, पवारांना मी देतो शुभेच्छा, त्यांनी एनडीएत यावे ही इच्छा, अशी मागणी कवितेद्वारे केली. लव्ह मॅरेज...पत्नी ब्राम्हण समाजाची आहे. सांगलीत राहत होती. मध्य प्रदेशमधील कुटुंब. लव्ह मॅरेज नाही. परंतू तिने मला आणि मला तिने पाहिले होते. एकमेकांच्या मनात भरले होते. यामुळे आम्ही लग्न केले. तिच्या घरचे नातेवाईक माझ्या घरी येतात, आम्ही त्यांच्या घरी जातो, असे सांगितले. जेव्हा माझ्या सोबत आली माझी बायको सीमा, तेव्हा मी लागलो होतो माझ्या कामा...अशी शीघ्र कविता देखील त्यांनी केली.