मी महायुतीसोबत असताना राज ठाकरे यांची महायुतीला आवश्यकता नाही? असं विधान केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे प्रमुख रामदास आठवले यांनी केलं होतं. त्यावरून आता मनसेकडूनरामदास आठवले यांच्यावर बोचरी टीका करण्यात येत आहे. दरम्यान, रामदास आठवले हे भाजपाच्या झाडावरचं बांडगुळ आहे, असं विधान मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केलं आहे.
मनसे नेते प्रकाश महाजन रामदास आठवलेंवर निशाणा साधताना म्हणाले की, रामदास आठवले यांनी असं विधान प्रसारमाध्यमांसमोर करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विचारणा करावी. आमचे हिंदुत्वाचे विचार सारखेच असल्याने आम्ही राज ठाकरेंच्या पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सोबत घेण्याबाबत विचार करू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. रामदास आठवलेजी तुमचा पूर्ण आदर करून सांगतो की, गोपिनाथ मुंडे यांनी तुम्हाला भाजपाच्या झाडाखाली आणलं. तुम्ही त्या झाडावर चढलात आणि आता तुम्ही त्या झाडाचं एक बांडगुळ आहात. तुमच्यामुळे भाजपाला काहीही फायदा नाही. मात्र भाजपामुळे तुम्ही अखंड मंत्रिपदावर आहात, हे रामदास आठवले यांनी लक्षात घ्यावं. तसेच तुम्ही काचेच्या घरात आहात याचा विचार करावा. रामदास आठवले यांच्याबाबत पूर्ण आदर ठेवून मी हे विधान करत आहे कारण त्यांनी माझ्या नेत्यावर टीका केली आहे, अशे प्रकाश महाजन म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका करताना रामदास आठवले म्हणाले होते की, "पुढे याबाबत काय निर्णय होणार आहे हे मला माहिती नाही. पण महायुतीमध्ये राज ठाकरे यांना घेण्यामध्ये अजिबात फायदा नाही. त्यांची हार्ड लाईन असल्यामुळे त्यांचा विशेष आपल्याला फायदा होणार नाही. मी महायुतीसोबत असताना त्यांची काय आवश्यकता आहे? त्यामुळे त्यांची महायुतीमध्ये आवश्यकता नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही त्यांना बरोबर घ्याल पण ते येतील की नाही माहिती नाही. महापालिकेच्या निवडणुकीत काय निर्णय होईल मला माहिती नाही. पण महापालिकेच्या निवडणुकीत त्यांचा फायदा होऊ शकतो. काही ठिकाणी त्यांचा थोडा उपयोग होऊ शकतो. काय निर्णय घ्यायचा तो देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार घेतील. माझं व्यक्तिगत मत आहे की, त्यांना सोबत घेतल्याने महायुतीचे नुकसानचं होणार आहे," असा टोला रामदास आठवले यांनी लगावला होता.