Ramdas Athawale News: आताच्या घडीला राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष, नेते कंबर कसून तयारीला लागले आहेत. विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच मंत्रिमंडळ विस्ताराकडे शिवसेना शिंदे गटासह अन्य मित्र पक्षांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री आणि रिपाइं नेते रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देताना शिंदे-फडणवीस सरकारला खोचक टोला लगावला. वाद करत बसण्यापेक्षा आधी प्रश्न सोडवा, मंत्रिमंडळ विस्तार करा, असे रामदास आठवले म्हणाले.
वाद करण्यात आणि मिटवण्यातही आम्ही ॲक्टिव्ह आहोत. एक दिवस एक जाहिरात आली आणि दुसऱ्या दिवशी दुसरी जाहिरात आली त्यात आमचा वाद मिटला. राज्यातील अनेक प्रश्न अद्यापही संपलेले नाहीत. मंत्रिमंडळ विस्तार करा, कार्यकर्त्यांना, लोकांना कामाला लावा. उगाच वाद करत बसू नका. मंत्रिमंडळ विस्तारात आमच्या पक्षालाही प्रतिनिधित्व द्या, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. ते माध्यमांशी बोलत होते.
महाविकास आघाडीने त्याबाबत आम्हाला सांगू नये
सध्या जाहिरातीवरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, असे उगाच वाद करत बसू नका. एक दिवस एक जाहिरात आली आणि दुसऱ्या दिवशी दुसरी जाहिरात आली आणि वाद मिटला खरा. मात्र आम्ही वाद करण्यात अॅक्टिव्ह आहोत तसेच वाद मिटवण्यातही अॅक्टिव्ह आहोत हे दिसून आले आहे. महाविकास आघाडीने त्याबाबत आम्हाला सांगू नये, असा पलटवार रामदास आठवले यांनी केला. तसेच महाराष्ट्रासमोर सध्या अनेक प्रश्न आहेत. दीड-दोन वर्षाचा काळ निवडणुकीला राहिलेला आहे. एकाच मंत्र्याकडे अनेक खात्यांचा कारभार आहे. लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात यावा. महामंडळांवर नियुक्ती करण्यात याव्यात. लोकांचे प्रश्न मार्गी लावावेत. हे करत असताना आमच्याही पक्षाला गृहित धरुन मंत्रिमंडळात समावेश करुन घ्यावा. त्यांना हीच विनंती आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आमच्यासाठी समसमान आहेत. कोण छोटा, कोण मोठा हा वाद करत बसण्यापेक्षा महाराष्ट्रासमोरील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करावे. सध्या दलित अत्याचाराच्या घटना वाढता आहेत, यासाठी काम करावे. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी हैराण झाला होता. त्यांच्यासाठी पंधराशे कोटीचा निधी मंजूर केला आहे, तो तात्काळ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा. आपापसांत वाद करत बसू नये. एकत्र काम करावे अशी आमची भूमिका आहे, असे रामदास आठवले यांनी स्पष्टपणे सांगितले.