सोलापूर : राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना आणि भाजपाने राज्यसभेसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तर यासाठी महाराष्ट्रातून काँग्रेसने बाहेरचा उमेदवार दिल्याने नाराजी आहे. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपसोबत राहायला हवे होते. मात्र मागील काही दिवसांपासून त्यांच्या हालचाली या भाजपविरोधी होत्या, असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले आहे.
शिवसेने आधी उमेदवार जाहीर केला. त्यामुळे भाजपने उमेदवार जाहीर केला आहे. जर निवडणूक बिनविरोध करायची होती तर शिवसेने सहाव्या जागेसाठी उमेदवार द्यायला नको होता. तसेच, संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपसोबत राहायला हवे होते, मात्र मागील काही दिवसांपासून त्यांच्या हालचाली या भाजपविरोधी होत्या. भाजपकडून उमेदवारी हवी अशी त्यांची भूमिकाच नव्हती. ते अपक्ष उभे राहणार असेच म्हणत होते, असे रामदास आठवले म्हणाले.
संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेने शब्द दिला होता, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिवसेनेने त्यांना धोका दिला आहे, भाजपने नाही, असे रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच, धनंजय महाडिक हे ताकदवर उमेदवार आहेत, त्यामुळे सहावी जागादेखील भाजप जिंकणार, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. याचबरोबर, केंद्रातील मोदी सरकारच्या आठ वर्षे पूर्तीनिमित्त रामदास आठवले यांनी कवितामय शुभेच्छा दिल्या. "मोदी साहेब आणि माझी पडली होती गाठ, त्याला वर्ष झाली आता पूर्ण आठ आणि शेतकऱ्यांची आम्ही अजिबात सोडणार नाही पाठ, शेतकऱ्यांच्या दुष्मनांची लावून टाकू आम्ही वाट!", असे रामदास आठवले म्हणाले.
शेतकऱ्यांनी दोन वेळा आमच्या पाठीशी राहून आम्हाला निवडून दिले. आम्ही त्यांच्या विरोधात असूच शकत नाही. शेतकरी कायदे आणले, त्यामागे शेतकऱ्यांचे नुकसान व्हावे अशी आमची भावना अजिबात नव्हती. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातही शेतकरी कायदे आणू असे सांगितले होते, मात्र आम्ही आणलेल्या कायद्याला विरोध केला, असे रामदास आठवले म्हणाले.
शेतकरी कायदे परत आणायचे असतील तर सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करावे लागतील. मागचे शेतकरी कायदे रद्द केले, तेच कायदे परत आणायचे प्रयत्न झाले तर शेतकऱ्यांत रोष निर्माण होईल. आम्ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहोत. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करुनच नवीन कायद्यासंदर्भात विचार करु.पुढील अधिवेशनात हे कायदे आणणार नाही, कारण आमच्याकडे अजून दोन वर्षे आहेत आणि आणखी पाच वर्षे आमचेच सरकार असणार आहे, असेही रामदास आठवले यांनी सांगितले.