मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेची घटिका समीप आलेली असतानाच राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादीचं नवं सरकार आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांनतर यावरून राजकीय प्रतिक्रिया येत असून, अजित पवारांच्या निर्णयाला शरद पवारांनी पाठींबा दिला पाहिजे असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले आहे.
एएनआय न्यूज वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना आठवले म्हणाले की, काल झालेल्या घडामोडींविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेला न्यायालयात जाण्याचे संपूर्ण अधिकार आहेत. मात्र आम्हाला सुद्धा सरकार बनवण्याचे अधिकार होते. शिवसेना भाजपसोबत येईल अशी अपेक्षा होती, मात्र त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचे ठरवल्याने हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे आठवले म्हणाले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनले असून अजित पवार सुद्धा उपमुख्यमंत्री झाले आहेत. तर हा महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी अजित पवारांसोबत शरद पवार यांनी सुद्धा उभा राहिले पाहिजे. त्यामुळे शरद पवार यांनी अजित पवारांच्या निर्णयाला पाठींबा देऊन त्याचे स्वागत केले पाहिजे अशी माझी त्यांना विनंती असल्याचे आठवले म्हणाले आहे.
तसेच नवीन स्थापन झालेले सरकर कायम राहणार असल्याचा दावा सुद्धा आठवले यांनी यावेळी केला. तर येणाऱ्या 30 तारखेला आम्ही आपले बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी राहणार असल्याचे सुद्धा आठवले म्हणाले.