मुंबई - एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आहे. त्यांच्यासोबत ३५ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये एक अपक्षही आमदार आहेत. शिंदे यांनी आपल्यासोबत यापैकी काही आमदारांना नेले आहेच, परंतू ठाण्यातील त्यांचे खास पदाधिकारीदेखील सूरतला गेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही" असं म्हणत शिंदेंनी सूचक ट्विट केलं. "आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही" असं शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. याच दरम्यान आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. रामदास आठवले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला आहे. महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही" असं रामदास आठवले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं बंड मोडून काढण्यासाठी आता शिवसेना पक्षप्रमुखांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला केवळ १८ आमदार उपस्थित होते. या बैठकीत एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव स्वीकारू नका अशी भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली. तर आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी शिवसेनेने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे सूरतला रवाना झाले आहे. याच दरम्यान मनसेने शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"नकली हिंदुत्ववाद्यांचा पत्त्याचा बंगला कोसळणार"; मनसेचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल
"नकली हिंदुत्ववाद्यांचा पत्त्याचा बंगला कोसळणार" असं म्हणत मनसेने टीकास्त्र सोडलं आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "शिवसेनेच्या बैठकीत ५५ आमदारांपैकी फक्त १८ विधानसभा आमदार उपस्थित... तरी पुढील २५ वर्ष मोठे नवाबच मुख्यमंत्री असणार विश्वप्रवक्ते यांचा दावा... मनात राम न ठेवता फक्त नौटंकी म्हणून अयोध्येला जाऊन आलात की हे असं होतं... नकली हिंदुत्ववाद्यांचा पत्त्याचा बंगला कोसळणार..." असं गजानन काळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.