रामदास कदम यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. य़ानंतर आता रामदास कदम यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. "52 वर्षे मी कामं केलं पण माझ्यावर नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आयुष्याची संध्याकाळ अंधारमय होईल असं कधीच वाटलं नव्हतं" हे सांगताना रामदास कदम अत्यंत भावूक झालेले पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी शरद पवारांवर देखील जोरदार निशाणा साधला होता. "शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडला" असं म्हणत टीकास्त्र सोडलं. यानंतर आता केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे प्रमुख नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी यावर भाष्य केलं आहे.
"शिवसेना फोडणारे शरद पवार नसून संजय राऊत होते" असं गंभीर आरोप आता रामदास आठवले यांनी केला आहे. तसेच संजय राऊत (Sanjay Raut) यांना राष्ट्रवादीसोबत जायचं असल्याने त्यांनी भाजपा शिवसेनेची युती तोडली असंही म्हटलं आहे. "संजय राऊत यांनी गडबड केली नसती तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं नसतं आणि भाजपा शिवसेनेचं सरकार महाराष्ट्रात आलं असतं" असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. आठवले यांनी संजय राऊत यांच्यावर पक्षात फूट पडल्याचा आरोप केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीशी युती केल्याचं देखील सांगितलं.
"ठाकरेंनी राऊतांच्या सांगण्यावरूनच राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला"
"शिवसेना फोडणारे शरद पवार नसून संजय राऊत होते. उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला" असं म्हणत आठवले यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. रामदास कदम यांनी पवारांवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीने रामदास कदम यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "कशाला तुमचे खापर शरद पवारांवर फोडता, सत्तापिपासूमुळे वाण नाही पण आता गुण लागला" असं म्हणत हल्लाबोल केला आहे.
"कशाला तुमचे खापर शरद पवारांवर फोडता, सत्तापिपासूमुळे वाण नाही पण आता गुण लागला"
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (NCP Rupali Patil Thombare) य़ा रामदास कदम यांच्यावर संतापल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. "शिवसेना पक्षातील काही लोक व त्यांचे बंडखोर आमदार यांच्यात काही झाले की आलेच मा. शरद पवार साहेबांना मध्ये घ्यायला. बाबांनो तुमचे काम, तुमचे वाद स्वतःच्या हिंमतीवर करा. कशाला तुमचे खापर मा.शरदजी पवार साहेबांवर फोडता.#सत्तापिपासूमुळे वाण नाही पण गुण लागला वाटत तुम्हाला" असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.