मीरा रोड - ''गोरगरीब फेरीवाल्यांवर दादागिरी करीत त्यांच्यावर हल्ला करण्यापेक्षा मनसैनिकांनी लष्करात जाऊन सीमेवर्ती देशाच्या दुष्मनांशी लढावे . गरीब फेरीवाल्यांवर, हल्ला झाला तर भीमसैनिक मनसैनिकांना चोख उत्तर देतील'', असा इशारा रिपाइंचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना दिला आहे.
मीरा रोड येथील हॉटेल सनशाईन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. फेरीवाल्यांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांच्याबद्दलची तक्रार पोलीस आणि प्रशासनाला करता येऊ शकते . त्यांच्यावर प्रशासन कारवाई करेल मात्र मनसेने कायदा हातात घेऊ नये. मनसैनिकांनी गरीब फेरीवाल्यांवर दादागिरी करीत हल्ले करू नयेत. फेरीवाल्यांवर ज्या मन सैनिकांनी हल्ले केलेत त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, असे सांगत गरीब फेरीवाल्यांच्या रक्षणासाठी भीमसैनिक आणि रिपाइंचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील असा इशाराही रामदास आठवले यांनी दिला आहे .
सामान्य जनतेतील 70 टक्के लोक फेरीवाल्यांकडूनच वस्तू घेतात . सरकारने ही फेरीवाल्यांवबद्दल निश्चित धोरण ठरविले पाहिजे . दिल्लीत फेरीवाल्यांना मान्यता आहे. तशीच सन 2014 च्या निवडणुकीत मतदान केलेल्यांच्या झोपड्या पत्र ठरवाव्यात यामागणीप्रमाणेच सन 2014 पर्यंतचे फेरीवाले अधिकृत करण्यात यावे अशी रिपाइंची मागणी असल्याचे रामदास आठवले म्हणाले.
भाजपा शिवसेनेने वाद करू नये आगामी निवडणुकांमध्ये भाजपा शिवसेनेने एकत्र येऊन निवडणूक लढावी असा सल्लाही रामदास आठवलेंनी दोन्ही पक्षांना दिला. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपासोबत रिपाइं युती होणार असून जास्तीत जास्त दलित मतदान भाजपाला मिळवून देण्यासाठी रिपाइं भाजप सोबत राहील असे यावेळी रामदास आठवले यांनी सांगितले .