मुंबई - काही दिवसांपूर्वी आमदार योगेश कदम यांच्या कारचा अपघात झाला होता. एका डंपरने योगेश कदम यांच्या कारला मागून धडक दिली होती. या घटनेत कदम यांच्या कारचा मागील भाग चक्काचूर झाला. सुदैवाने या अपघातात योगेश कदम यांना दुखापत झाली नाही. परंतु पोलिसांचा ताफा मागे-पुढे असताना डंपरने दिलेली धडक संशयास्पद असल्याचं म्हणत या अपघाताची कसून चौकशी व्हावी अशी मागणी योगेश कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
त्यात आता रामदास कदमांनी या प्रकरणी डंपर चालक चौकशीत खोटं बोलतोय असा दावा केला आहे. पोलिसांनी या अपघातप्रकरणात डंपर चालकाला अटक केली. या चौकशीत डंपरचालक वाहनाचा ब्रेक फेल झाल्याचं सांगतोय. परंतु जेव्हा पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता डंपरचा ब्रेक फेल झाला नव्हता असं समोर आले. त्यामुळे दाल मै कुछ काला है असं म्हणत रामदास कदम यांनी या चौकशीबाबत मी रोजच्या रोज संपर्कात असून माहिती घेत असल्याचं म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं होते?या अपघाताबाबत आमदार योगेश कदम म्हणाले होते की, ६ जानेवारीला रात्री ९ च्या सुमारास खेडवरून निघालो. कशेडी घाट उतरल्यानंतर माझ्यापुढे रायगड पोलिसांची गाडी होती. त्यानंतर माझी गाडी आणि माझ्या मागे रत्नागिरी पोलिसांची गाडी होती. डंपर जो आला तो प्रचंड वेगाने आला. रस्ता मोठा होता. माझ्या कारला त्या डंपरने धडक दिली त्यात माझी कार ३६० डिग्री फिरली. त्यानंतर तो डंपर पुढे पळून गेला. त्यानंतर दीड किलोमीटर अंतरावर डंपर रस्त्याखाली दिसला आणि डंपरचालक फरार झाला होता. सुदैवाने आई जगदंबेच्या आशीर्वादाने आम्ही वाचलो. माझ्या वाहन चालकाला किरकोळ दुखापत झाली असं त्यांनी सांगितले होते.
त्याचसोबत जो अपघात झाला तो सामान्य अपघातासारखा वाटत नाही. पोलीस यंत्रणेला मी तक्रार दिली आहे. संबंधित पोलीस अधिकारी तपास करतील. ज्या शंका मला वाटतात त्या पोलिसांना सांगितल्या आहेत. माझ्या मागे आणि पुढे पोलिसांची गाडी असताना डंपर माझ्या कारला धडकला. १०० च्या वर त्या डंपरचं स्पीड होते. माझ्या कारचा मागचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. हा घातपात आहे की नाही याची खात्री करणं गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशी करण्याची मागणी करणार आहे असं आमदार योगेश कदम यांनी म्हटलं होतं.