"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 07:44 PM2024-11-26T19:44:57+5:302024-11-26T19:48:31+5:30
मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरु असतानाच रामदास कदम यांनी अजित पवारांबाबत मोठं विधान केलं आहे.
Maharashtra Assembly Election Result 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदारांनी भरभरुन मते दिली आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला २८८ पैकी २३० जागा मिळाल्या आहेत. एकट्या भाजपला १३२ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपचा या निवडणुकीतील स्ट्राइक रेट सर्वात उत्तम होता. मात्र निकाल लागून तीन दिवस उलटले तरी महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरत नाहीये. मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी अजित पवारांबाबत धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरुन महायुतीच्या नेत्यांमध्ये निकालापासून जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दिल्लीत महायुतीचे वरिष्ठ नेत मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याचे म्हटलं जात आहे. अशातच रामदास कदम यांनी
बहुमत मिळवलेल्या महायुतीत मुख्यमंत्रीपदावरुन धुसफूस सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. "भाजपच्या मंडळींना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, शिवसेनेच्या आमदारांना वाटतं एकनाथ शिंदे व्हावेत. अजित पवार तर आता सरेंडर झाले आहेत. त्यांनी आमची बार्गेनिंग पॉवर कमी केली आहे हा वेगळा भाग आहे. पण मुख्यमंत्रीपदावरुन कोणी, कितीही, काहीही प्रयत्न केले तरी आमच्या युतीत मतभेद होणार नाहीत," असं रामदास कदम यांनी म्हटलं.
"एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई झाली होती. नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून ही लढाई लढली आणि मोठ्या प्रमाणात यश मिळवून दिलं आहे. आता झुकतं माप कोणत्या बाजूला टाकायचं याचा निर्णय श्रेष्ठींना घ्यायचा आहे," असंही रामदास कदमांनी स्पष्ट केलं.
रामदास कदमांनी शांत राहावं - अमोल मिटकरी
रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाष्य केलं आहे. "जर रामदास कदम यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटत असेल आणि आमच्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली असेल तर मला वाटतं हा निवडणुकीनंतरचा सर्वात मोठा जोक आहे. ते फार मोठे नेते आहेत, त्यामुळे शांत राहावं. उगाच तळपळाट करुन काही भेटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत अभेद्य आणि मजबूत आहे," असंही त्यांनी सांगितलं आहे.