मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठित खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले. ५१ आमदार गद्दार कसे होतात. गद्दार तर तुम्ही आहात. हॉस्पिटलला होतो, हात-पाय हलत नव्हते हे सगळं नाटक आहे. उद्धव ठाकरेंची नौटंकी आहे. मी मातोश्रीची नसनस ओळखतो. उद्धव ठाकरे काय आहेत, रश्मी ठाकरे काय आहेत, आदित्य काय आहेत हे मला माहिती आहे अशा शब्दात शिंदे गटाचे शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे.
रामदास कदम म्हणाले की, आम्ही उभा केलेला पक्ष पत्त्यासारखं कोसळतोय डोळ्यसमोर बघतोय. उद्धव ठाकरेंना सगळं आयतं मिळालं. त्यांचे योगदान काही नाही. आम्ही ५२ वर्ष सगळं भोगलंय. आमच्यासाठी सुपाऱ्या दिल्यात. जे शिवसेनाप्रमुख अख्ख आयुष्य काँग्रेस-राष्ट्रवादीशी लढले आणि हिंदुत्व वाढवलं. त्याच काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून मुख्यमंत्रिपद घेतले. उद्धव ठाकरे कधीही कुणाचं ऐकत नाही. त्यांना खूप कमी लोकांनी ओळखलं आहे. मी बरोबर ओळखून आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादी पुरस्कृत उद्धव ठाकरेंची शिवसेना यात जमीन आस्मानचा फरक आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना नेत्यांची किंमत शून्य झाली. उद्धव ठाकरे हुकुमशहा झाले. बाळासाहेब ठाकरे साधे होते असं बोलतात पण ते हुशार होते. शिवसेना मागे जाण्यात उद्धव ठाकरेच जबाबदार आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी प्रतारणा करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले. गद्दार तुम्ही आहात. माणूस बुडतो तेव्हा हातपाय हलवतो. या आमदारांनी निर्णय घेतला नसता तर पुढच्या विधानसभेत एकही आमदार निवडून आला नसता. कारण राष्टवादीने अडीच वर्षात पराभूत आमदारांना ताकद देण्याचं काम केले असा आरोप रामदास कदम यांनी केला.
दरम्यान, ५-१० तास आमदार, खासदारांना वर्षा बाहेर उभं करायचे. कुणाला भेट द्यायची नाही. आता तुम्ही लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी खोटं सांगताय. तुम्ही हॉस्पिटलमध्ये असताना रामदास कदम आणि त्याच्या मुलाला संपवण्याचं कटकारस्थान तुमचं सुरू होते. त्यावेळी बैठकीत सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, उदय सामंत होते. योगेशला संपवून टाका. कदम कुटुंब संपवायचं आहे असे हॉस्पिटलला दाखल असताना आदेश देत होते. उदय सामंत त्या बैठकीत होते आणि ते सगळे आता बाहेर आले. सहानुभूती मिळवण्यासाठी मी बेशुद्ध होते वैगेरे नाटकं करत आहेत. पालापाचोळा तुम्ही झालात असा टोला रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
बाळासाहेब जिवंत असते तर...महाराष्ट्रात कुणालाही विचारा, शिवसेनाप्रमुख जिवंत असते तर उद्धव ठाकरेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन मुख्यमंत्री बनवलं असतं का? रस्त्यावर आलात? संघर्ष केलात? तुमच्या अंगावर किती केसेस आहेत? आम्ही जेल भोगलीय. संघर्ष केलाय. बाळासाहेबांचा मुलगा त्याव्यतिरिक्त तुमचं शिवसेनेसाठी योगदान काय? असा सवाल रामदास कदमांनी विचारला आहे.