मुंबई: अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. यामध्ये शिवसेनेचे सहा मंत्रीही सहभागी झाले होते. यावेळी पत्रकारपरिषदेमध्ये शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री संबोधल्याने नवी चर्चा रंगली आहे.
सुरवातीला कदम यांनी बैठकीचा विषय स्पष्ट करताना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आपण बैठकीला उपस्थित राहत असल्याचे सांगितले. कारण शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. असे असताना शिवसेना अनुपस्थित राहिली असे व्हायला नको, असेही त्यांनी सांगत बैठकीतील वृत्तांत सांगितला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. यामध्ये शिवसेनेचे मंत्रीही सहभागी झाल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या सत्तेच्या गुऱ्हाळावरही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची ही बैठक असल्याचे शिवसेना नेत्यांनी स्पष्ट केले.
यावेळी कदम यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत तातडीने शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावर सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होकार दिला आहे, असे म्हटले. 10 हजार कोटींची मदत अत्यंत कमी आहे. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आकड्यानुसार ही मदत 17 हजार कोटींच्या पलिकडे जाते. यामुळे तेवढी मदत करावी अशी मागणी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केल्याचे कदम यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोणाचा यावरून शिवसेना-भाजपामध्ये कलगीतुरा रंगला असून दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून परस्परविरोधी विधाने केली जात आहेत. यातच सामनाच्या अग्रलेखात मुख्यमंत्र्यांसाठी मावळते असा शब्द प्रयोग करण्यात आला होता. यानंतर आज शिवसेनेच्या एका मंत्र्यानेच फडणवीसांना मावळते मुख्यमंत्री म्हटल्याने आता थेट फडणवीसांवरच टीकेचे बाण सोडण्यास सुरूवात झाली आहे.