दापोली - महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्याचा संघर्ष नवीन नाही. ठाकरे, पवार, मुंडे घराण्यालाही या संघर्षाचा फटका बसला. आता आणखी एका काका पुतण्याचा संघर्ष राजकारणात पाहायला मिळणार आहे. दापोली मतदारसंघात शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांच्याविरोधात त्यांचाच सख्खा चुलत भाऊ अनिकेत कदम समोर आले आहेत. अनिकेत कदम हे रामदास कदम यांचे पुतणे आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत अनिकेत कदम उद्धव ठाकरे गटाच्या प्रचारात दिसणार आहेत.
खेड दापोली मतदारसंघात रामदास कदम यांचं वर्चस्व आहे. याठिकाणी विद्यमान आमदार योगेश कदम हे शिंदेंच्या शिवसेनेत आहे. मात्र याठिकाणी ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून संजय कदम यांचे नाव आघाडीवर आहे. दापोलीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बॅनरवर अनिकेत कदम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर्स झळकले आहेत. अनिकेत हे रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांचे सुपूत्र आहेत. अनिकेत कदम यांनी अलीकडेच मातोश्रीत जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.
कदमविरुद्ध कदम संघर्ष
रामदास कदम आणि त्यांचे बंधू सदानंद कदम यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. त्यातूनच अनिकेत कदम हे आता त्यांचे सख्खे चुलत बंधू योगेश कदम यांच्याविरोधात उभे आहेत. उद्धव ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार संजय कदम यांना निवडून आणण्यासाठी अनिकेत कदम मदत करणार आहेत. त्यामुळे खेड दापोली मतदारसंघात कदमविरुद्ध कदम असा संघर्ष येत्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पाहायला मिळू शकतो.
भाजपाबाबत रामदास कदमांची नरमाईची भूमिका
दरम्यान, भाजपा पदाधिकारी, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर आगपाखड करणारे रामदास कदम यांनी भाजपावर नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसून आले. आम्हाला आमची महायुती टिकवायची आहे. कोण चुकलं असेल तर त्यालाही सोबत घेऊन पुढे जायचं आहे. कोकणातील जनता सुज्ञ आहे. गद्दारी आम्ही केली नाही तर उद्धव ठाकरेंनी केली असा आरोप रामदास कदमांनी केला.