मुंबई - शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी अखेर आपल्या नेतेपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सोपवला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रामदास कदम नाराज असल्याची चर्चा होती. त्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडत असल्याचं चित्र निर्माण झाले. रामदास कदम यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम हे शिंदे गटात उघडपणे सहभागी झाले. त्यानंतर आता रामदास कदम यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. य़ानंतर आता रामदास कदम यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
"52 वर्षे मी कामं केलं पण माझ्यावर नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आयुष्याची संध्याकाळ अंधारमय होईल असं कधीच वाटलं नव्हतं" हे सांगताना रामदास कदम अत्यंत भावूक झालेले पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी शरद पवारांवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. "शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडला" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. "मी खूप अस्वस्थ आहे. मी राजीनामा दिल्याने मी समाधानी नाही, आनंदी नाही. 52 वर्षे लढणारा नेता राजीनामा का देतो? याचा विचार करायला हवा. दु:ख होतं वेदना होतात. मी प्रामाणिकपणे हात जोडून आपण राष्ट्रवादीसोबत बसू नका असं सांगितलं होतं"
"बाळासाहेबांनी हिंदुत्व वाढवलं. ही बाळासाहेबांची शिवसेनाची नाही, शरद पवारांनी डाव साधला, उद्धव ठाकरे भोळे आहेत. त्यांना पवारांचा डाव कळला नाही. शरद पवारांनी पक्ष फोडला" असं म्हटलं आहे. "उद्धव साहेबांनी नोंद घेतली असती तर एकनाथ शिंदेंसह 51 आमदारांवर ही वेळच आली नसती. किती जणांची हकालपट्टी करणार त्यापेक्षा तुमच्या आजुबाजुला कोण आहे ते आधी पाहा... कोण बैल म्हणतो, कोण, कुत्रे म्हणतोय मग आमदार चिडले... मी एकनाथ शिंदे गुवाहाटीला असताना बोललो... प्रयत्न केले पण यश आले नाही. मराठी माणूस जगला पाहिजे. शिवसेना जगली पाहिजे, आमच्यासारखा कडवा सैनिक का जातो? हे पाहिलं पाहिजे" असं देखील रामदास कदम यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.