शिवसेनेतील बंडखोर आमदार, माजी मंत्री उदय सामंत यांच्या मोटारीवर शिवसैनिकांनी मंगळवारी रात्री कात्रज चौकात हल्ला केला. या दगडफेकीत सामंत यांच्या मोटारीची काच फुटली. यानंतर शिवसेनेनं केलेल्या एका विधानामुळे विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. उदय सामंत यांच्यावरील हल्ला, ही उत्स्फुर्त प्रतिक्रिया असल्याचं विधान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई याांनी केलं आहे. सुभाष देसाईंच्या या विधानामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावरून रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी सुभाष देसाईंवर (Shivsena Subhash Desai) बोचरी टीका केली आहे. "सुभाष देसाई कॅबिनेटमध्ये झोपा काढणार माणूस" असं म्हणत निशाणा साधला आहे.
"सुभाष देसाई म्हणजे फार झंझावात आणि वाघासारखा नेता आहे. त्यांची प्रतिमा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे. पण पहिल्यांदा त्यांनी तोंड उघडलं याचं मला आश्चर्य वाटलं. कारण प्रत्येक कॅबिनेटमध्ये झोपा काढणार माणूस आता जागा झाला आणि बोलतोय... त्याचं मला आश्चर्य वाटतंय" असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी सुभाष देसाईंना टोला लगावला आहे. उदय सामंत यांच्यासोबत घडलेल्या प्रकारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली.
"गाडीवर दगड मारून पळून जाणे ही मर्दुमकी नाही. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे आहे. ते पोलीस करतील. ज्यांनी भ्याड हल्ला केला, त्यांच्यावर पोलीस कायदेशीर कारवाई करतील. याबाबत मी पोलिसांशी बोलतो. कायदा सुव्यवस्था राखणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे", असे ते म्हणाले. उदय सामंत यांची गाडी सिग्नलला थांबली होती. ती पाहिल्यावर शिवसैनिकांनी गद्दार गद्दार म्हणत गाडीवर चपला, दगड, बाटल्या फेकल्या. त्यात गाडीची काच फुटली. हा प्रकार पाहताच पोलीस तातडीने सामंत यांच्या मोटारीला वाट करुन दिली.
उदय सामंत म्हणाले, "माझ्या गाडीवर झालेला हा भ्याड हल्ला आहे, गाडी सिग्नलला थांबली असताना २० ते २५ जणांनी माझ्या गाडीवर हल्ला केला. त्यांच्या हातात दगड व बेसबॉल स्टिक्स होत्या. हा हल्ला म्हणजे पुर्वनियोजित षडयंत्र आहे. मला आदित्य साहेबांची सभा आहे याची कल्पना नाही. माझी गाडी केवळ सिग्नलला थांबली होती. त्यावेळी ठरवून हा हल्ला झाला. मी कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही.याबाबत मी मुख्यमंत्री महोदय यांच्या कानावर घातले आहे, माझ्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात पोलिसांनी कारवाई करावी", अशी मागणी उदय सामंत यांनी केली.