मुंबई - एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत.शिवसेना नेते आणि खासदार तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सद्य राजकीय घडामोडींवर सडेतोड पण भाष्य केले. याच दरम्यान आता रामदास कदम (Ramdas kadam) यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. तसेच "उद्धव ठाकरेंना मराठा समाजाच्या लोकांना मोठं होऊ द्यायचं नाही" असा गंभीर आरोप केला आहे.
रामदास कदम यांनी "उद्धव ठाकरेंना मराठा समाजाचे लोक जे मोठे होताहेत त्यांना मोठं होऊन द्यायचं नाही. नारायण राणे, एकनाथ शिंदे, रामदास कदम ही त्याची उदाहरणं आहेत. कुठल्याही मराठा नेत्याला ते मोठं होऊ देत नाहीत अशी भूमिका उद्धव ठाकरेंची आहे की काय? असा प्रश्न मला पडला आहे" असं म्हटलं आहे. तसेच "कोण गद्दार आहे? याचं आत्मपरिक्षण तुम्ही करून बघा, 51 आमदार का जातात, शेकडो लोक सोडून का जातात? याचा विचार करा. उद्वव ठाकरे आमदारांना भेटले असते तर ही वेळ आली नसती" असं म्हणत टोला लगावला आहे,
"तीन, तीन वर्षे मला बोलून दिलं नाही, भाषणं करू दिली नाहीत. शिवसेनेत माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. माझ्या खात्याअंतर्गत घेण्यात आलेले निर्णय आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले" असा आरोप कदम यांनी केला आहे. तसेच "मला आणि माझ्या मुलाला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न झाला" असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. हॉस्पिटलमध्ये असताना आमच्याविरोधात कटकारस्थान रचलं आहे. तुम्ही आम्हाला संपवत नाहीत तर कोकणातल्या शिवसेनेला संपवत आहात असं म्हणत रामदास कदम यांनी जोरदार टीका केली आहे. TV9 मराठी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
"तुमच्या मनात हा पझेसिव्हनेस आहे की असुरक्षितता?"; मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल
सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांवर आपलं मत व्यक्त केलं. यानंतर आता मनसेने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "तुमच्या मनात हा पझेसिव्हनेस आहे की असुरक्षितता?" असा खोचक सवाल मनसेने उद्धव ठाकरेंना विचारला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "काँग्रेसने कधीच दावा केला नाही की महात्मा गांधी त्यांचेच, हिंदू महासभा कधीच म्हणाले नाही की सावरकर आमचेच, बाबासाहेब आंबेडकर तर देशाचेच मग तुमच्या मनात हा पझेसिव्हपणा का आहे? हा पझेसिव्ह नेस आहे की असुरक्षितता?" असं संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.