मुंबई - शिवसेनेची मुलुखमैदानी तौफ म्हणून परिचीत असलेले पर्यावरण मंत्री रामदास कदम अद्याप राज्यातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारात फरसे दिसले नाहीत. त्यामागे कारणही तसंच आहे. रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम दापोली मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहे. मुलाच्या विजयासाठी कदम यांनी संपूर्ण ताकत पणाला लावली असून ते दापोलीत तळ ठोकून आहे.
दुसरीकडे रामदास कदम यांच्या मुशीत तयार झालेले आमदार संजय कदम यांचं योगेश कदम यांच्यासमोर आव्हान आहे. संजय यांनी मतदारसंघात चांगलेच वर्चस्व निर्माण केले आहे. विरोधकांना सोबत घेत त्यांनी मतदार संघातील संघटन मजबूत केले. हेच वर्चस्व मोडून काढण्यासाठी रामदास कदम मागील चार वर्षांपासून मतदार संघावर लक्ष ठेवून आहे. त्यांनी आपले वजन वापरून अनेक योजनाही या मतदार संघात आणल्या. त्यात त्यांना काही अंशी यशही आले. मात्र निवडणूक म्हटलं की चुरस आली. आता ही चुरस आणखी वाढली आहे.
शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याविरोधी गटातील शिवसैनिकांना सोबत घेऊन रामदास कदम यांनी मुलासाठी यंत्रणा उभी केली. याला शिवसैनिकांनी विरोध केला. मात्र रामदास कदम यांनी तो विरोध जुमानला नाही. दुसरीकडे शिवसेनेतून फारकत घेतल्यानंतर राष्ट्रवादीकडून आमदारकी मिळवणाऱ्या संजय कदम यांना राष्ट्रवादीत क्रियाशील कार्यकर्ते मिळाले नाही. किंबहुना तयार करता आले नाही. त्यामुळे मतदारसंघातील पक्षाचा गाडा संजय कदम यांना एकट्याने ओढावा लागत आहे. तरी संजय कदम यांनी रामदास कदम यांना दापोली मतदार संघात तळ ठोकण्यास भाग पाडल्याचे चित्र आहे.