काल रामदास कदमांनी जी सभा घेतली ती संपूर्ण राजकीय वैचारिक बैठकीला छेद देणारी सभा आहे. रामदास कदमांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली आहे, तशी आजवर कुणीही वापरलेली नाही. यामुळे, रामदास कदमांनी जी भाषा वापरली, आज हा विषय जसजसा महाराष्ट्रात जाईल, तस-तशी महाराष्ट्रातील जनता विशेषतः महिला वर्ग रामदास कदमांची जोड्याने पुजा करतील. एवढेच नाही, तर रामदास कदमांनी जी भाषा वापरली, मी एवढंच सांगेल, की मुंबईत एक कोटी तीस लाख जनता राहते. त्या जनतेसाठी मुंबईत शौचालयाची व्यवस्था आहे. त्या संपूर्ण शौचालयाची जेवढी घाण नाही. तेवढी घाण काल रामदास कदमांच्या तोंडून बाहेर पडली आहे, अशा शब्दात शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे.
"रामदास कदमांनी उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात जे विधान केले, ज्यासंदर्भात मी कॅमेऱ्यासमोर तर नाहीच, पण खासगीतही उल्लेख करणार नाही. त्यामुळे हे विधान जेव्हा महाराष्ट्रातील जनतेसमोर जाईल, तेव्हा रामदास कदमांची जोड्याने पुजा होईल. मी पुन्हा बोलतो, की मुंबईतील शौचालयात जेवढी घाण नाही, त्याहूनही अधिक घाण काल रामदास कदमाने आपल्या तोंडातून ओकलेली आहे," असे भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांचा एकेरी उल्लेख करत म्हटले आहे.
"मी कधीही कुणावरही वैयक्तिक टीका करत नाही. रत्नागिरीतील सभा आणि दापोलीत केलेले वक्तव्य, यांत मी वैयक्तीक टीका केलेली नाही. उदय सामंत काय बोलले आणि रामदास कदम मला काय बोलले. हे गेल्या कित्तेयक वर्षांपासून माझ्या मनात होते. योग्यवेळ आल्यानंतर नंतर त्यांचेच शब्द मी त्यांच्या तोंडात घातले आहेत. याचाच अर्थ, त्यांनी ज्या तोंडाने घाण ओकली, तीच घाण मी त्यांच्या तोंडात घातली आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर कुठलीही टीका केलेली नाही," असेही भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते रामदास कदम - तत्पूर्वी, शिंदे गटातील नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी दापोलीत आयोजित जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली होती. "मी उद्धव ठाकरेंना सांगेन की शिवसेना तुम्ही नाही उभी केली. अनेक शिवसैनिकांचे खून पडलेत. अनेकांना जेलमध्ये जावं लागलं, जीवन उद्ध्वस्त झालं, संसार उद्ध्वस्त झालेत. तुमचं काय योगदान? वारंवार सांगतात मी बाळासाहेबांचा मुलगा. अरे हो कितीवेळा सांगशील. आम्ही कधी नाही म्हटलंय का? उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा नाही असं आम्ही म्हटलं का कधी? तुम्हाला काय संशय आहे काय? अरे आहेस ना तू त्यांचा मुलगा ते सांगायला कशाला लागतंय. तुझ्यामध्ये काही कर्तृत्व आहे का?" असे रामदास कदम यांनी म्हटले होते.
सोनियांच्या नादी लागू नका"शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वरुन बघत असतील आणि सांगत असतील ते की माझा मुलगा उद्धव हा शरद पवारांच्या नादाला लागून बिघडलाय. माझा मुलगा उद्धव हा सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडलाय. माझे विचार घेऊन तू पुढे चल तुझ्यासोबत मी आहे असं बाळासाहेब आज वरुन सांगत असतील", असेही रामदास कदम यांनी म्हटले होते.