मुंबई- औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे मंत्री रामदास कदम आणि खासदार चंद्रकांत खैरेमध्ये चांगलीच जुंपली होती. शहराचे नामांतर होत नाही त्याला सेनेचे मंत्री जबाबदार आहेत, असा आरोप चंद्रकांत खैरेंनी केला होता, त्याला प्रत्युत्तर देत प्रस्ताव केंद्रात असताना खैरे संसदेत काय करतात, असा सवाल कदमांनी उपस्थित केला होता. याच वादामुळे रामदास कदमांची औरंगाबादच्या पालकमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. रामदास कदमांच्या जागी डॉ. दीपक सावंत यांच्याकडे औरंगाबादचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. त्यामुळे शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार चंद्रकांत खैरेंनी आपले मित्र नंदकुमार घोडेले यांना औरंगाबादच्या महापौरपदावर बसवले होते, त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून त्यांनी अभय मिळवले होते. चंद्रकांत खैरे घोडेलेंना घेऊन ते थेट ‘वर्षा’वर धडकले होते. त्यामुळे पालकमंत्र्यांना अंधारात ठेवल्याची भावना रामदास कदमांमध्ये होती.नामांतराच्या या आंदोलनातही सेनेतील गटबाजी उघडपणे समोर आली होती. या आंदोलनात जिल्हाप्रमुख अंबादास दानवे गैरहजर होते. चार दिवसांपूर्वीच सिल्लोडचे नगरसेवक घरमोडे यांच्यावरील गुन्ह्यांसंदर्भात खैरे शिष्टमंडळासह जिल्हाधिका-यांना भेटले, त्यावेळीसुद्धा दानवे नव्हते. त्यांचा दानवेविरोध नवा नाही, तर दुसरीकडे दानवे आणि कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यात जाधव आता गप्प बसले असले तरी खैरे-जाधवांची खडाखडी आजवर अनेक वेळा दिसून आली. दानवेंना जसा खैरेंचा विरोध तसा सेनेतील बिगर मराठा लॉबीचा विरोध केला होता, अंबादास दानवे रामदास कदमांच्या गोटातील असल्याचीही चर्चा होती.
औरंगाबादच्या पालकमंत्रिपदावरून रामदास कदमांची उचलबांगडी, खैरेंवरची शेरेबाजी भोवली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 6:27 PM