बालाजी थेटे, ऑनलाइन लोकमत
औराद शहाजानी ( लातूर), दि. २३ - तेरणा नदीला आलेल्या पूरात एक इसम तब्बल २० तास अडकून पडला होता, अखेर स्थानिक मच्छिमारांनी त्याला वाचवले. रामदास खरटमोल असे त्या इसमाचे नाव आहे.
मी नेहमीप्रमाणे गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास शेतात गेलो. शेतातील म्हशीला चारण्यासाठी सोडले. दुपारी दीडच्या सुमारास अचानक मांजरा व तेरणा नदीला पूर आला आणि शेतातच पाणी घुसले. जीव वाचविण्यासाठी म्हैस, श्वानास उंचवट्यावर नेत होतो. पण वाढत्यामुळे उंचवट्याची धरणीही संपली. अखेर शेतातील चारपाईला म्हशीला बांधले आणि कुत्र्याला सोबत घेऊन झाडावर चढलो. त्यामुळे पुराच्या पाण्यात २० तास अडकून होतो. सुदैवाने स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने बचावलो, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात गेल्या पाच-सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे येथून वाहणा-या तेरणा व मांजरा नद्यांना पूर आला आहे. औराद शहाजानी येथील रामदास श्रीरंग खरटमोल (वय ३२) यांचे या नद्यांच्या पाच एकर काठावर शेती आहे. नेहमीप्रमाणे ते गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेताकडे गेले होते. म्हशीला चारण्यासाठी सोडले असता दुपारी दीड वाजेच्या सुमारास दोन्ही नद्यांंना पाणी वाढले आणि त्यांच्या शेतातून पाणी वाहू लागले. काही मिनिटांतच चार एकर शेतात पाणी थांबल्याने जीव वाचविण्यासाठी दोन जनावरांसह औराद-वांजरखेडा रस्त्याच्या उंचवट्याकडे धाव घेतली. उंचवट्यावर थांबलो; पण मांजरा नदीचे २० फुटांपर्यंत पाणी चढले तर तेरणा नदीचे ५० फुटांपर्यंत पाणी वाढले.
नजर फिरेल तिकडे पाणीच पाणी दिसू लागल्याने पुरातून बाहेर पडण्याचा मार्ग अंधारमय दिसू लागला. सोबत मोबाईल असल्याने कुटुंबियांना परिस्थितीची माहिती दिली. त्यामुळे आई, वडील, पत्नी व तीन मुले चिंताग्रस्त झाली. मी पाण्यातून सुखरुप बाहेर पडावा म्हणून कुटुंबियांनी देव पाण्यात ठेवून प्रार्र्थना करण्यास सुरुवात केली.
दिवस जस जसा मावळू लागला, तस तसे पाणी वाढू लागले. शेतातील गोठा पाण्याखाली गेला. त्यामुळे काय करावे सुचेना. दोन जनावरांसह चारपाई घेऊन रस्त्यावरील उंचवट्यावर थांबलो. दरम्यान, पुराचे पाणी कमी होण्याऐवजी चढतच असल्याने अखेर म्हशीस चारपाईला बांंधून श्वानाला सोबत घेऊन झाडावर चढलो. दरम्यान, आपण पाण्यात अडकल्याची माहिती शेजारील शेतकरी शिवकुमार आग्रे व दिलीप कत्ते यांना दिली.
रात्री झाली आणि जोराचा पाऊस सुरू झाला. जीव मुठीत धरून झाडावरच बसून होतो. कुटुंबियांना बोलावे म्हटले तर मोबाईलची चार्चिंगही संपली. त्यामुळे जगाशी संपर्कच तुटला. कुटुंबियांची आठवण येऊ लागल्याने ही शेवटची घटका तर नाही, अशी शंका मनात येऊ लागली. सकाळ झाली आणि ९ वाजता गावातील धनसिंग भोई, रामसिंग भोई, परशुराम भोई, मोहनसिंह भोई हे टायरचे ट्यूब घेऊन माझ्याकडे येत असल्याचे पाहून जीवात जीव आला. त्यांनी मला ट्यूबवर बसवून सोबत म्हैस व श्वानास घेऊन पाण्यातून मार्ग काढीत बाहेर पडलो.