मुंबई : योगगुरू रामदेव बाबा यांनी ठाण्यात आयोजित योग शिबिरात महिलांच्या कपड्यांवरून वादग्रस्त विधान केले. यानंतर त्यांच्यावर सडकून टीका होत आहे. रामदेव बाबा यांनी महिलांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचा विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही निषेध नोंदवला आहे. रामदेव बाबांचे विधान योग परंपरेला लांच्छन आणणारे आहे, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
रामदेव बाबा यांनी महिलांविषयी केलेल्या विकृत मानसिकता दाखवणाऱ्या विधानाचा मी निषेध करत आहे. तसेच याबाबत तीव्र नापसंती व्यक्त करीत आहे. त्यांनी योगासारख्या माध्यमातून संयम, स्वाथ्य, अशा गोष्टी समाजाला सांगितल्या असताना स्वतः मात्र महिलांबाबत असा दूषित दृष्टिकोन ठेवणे अत्यंत चुकीचे आहे. प्रत्येकच पुरुष अशा प्रकारे महिलांकडे पाहत नसतात, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
याचबरोबर, आपल्या घरात असलेले पुरुष, भाऊ, मित्र, सहकारी अशा अनेक पुरुषांबरोबर स्त्रीचा दैनंदिन जीवनात संपर्क येत असतो. मात्र आपल्या देशात स्वतःला गुरू म्हणवणाऱ्या अशा अनेक पुरुषांची जीभ घसरणे लाजिरवाणे आहे. यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांच्या पत्नी आणि इतर स्त्रिया तिथे उपस्थित होत्या. पण, याबाबत त्यांनीही यावर निषेध म्हणून बोलायला हवे होते. योगा सारख्या भारतीय परंपरेतील श्रेष्ठ बाबीसोबत रामदेव बाबाचे नाव लावणे आता त्यांच्या या विधानाने लांच्छनास्पद होईल. रावणाच्या स्त्रीच्या अपहरण करण्याच्या रावणाच्या मानसिकतेचे हे आणखी एक रूप आहे, अशी टीका देखील नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
महिला आयोगाने पाठवली नोटीसयोगगुरु रामदेव बाबा यांनी महिलांच्या कपड्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर चौहेबाजूंनी टीका होत आहे. अशातच बाबा रामदेव यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. कारण, त्यांना महाराष्ट्र महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. या नोटीसीमध्ये त्यांना दोन दिवसांमध्ये वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी स्पष्टीकरण मागितले आहे. महाराष्ट्र महिला आयोगाच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
रामदेव बाबा काय म्हणाले होते?ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना रामदेव बाबा यांनी महिलांच्या कपड्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले. 'साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात', असे विधान रामदेव बाबा यांनी केले आहे. रामदेव बाबा यांनी हे विधान केले. त्यावेळी व्यासपीठावर अमृता फडणवीस, शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.