लातूर - महायुती सरकार हे घोटाळ्याचे सरकार असून या असंवैधानिक सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड रोष आहे. कामांची कंत्राटे देताना ५० टक्के कमिशन घेतले जाते, या कमीशनखोर सरकारला सत्तेतून बाहेर काढले पाहिजे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले तसेच यश विधानसभेलाही मिळावे यासाठी कामाला लागा, एकजूट होऊन लढा विजय आपलाच आहे, असे आवाहन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले.
विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी रमेश चेन्नीथला यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आजपासून मराठवाडा आणि विदर्भाच्या दौ-यावर आहेत. या दौ-याची सुरुवात आज लातूर येथे झाली. लातूर येथे या सर्व नेत्यांनी लातूर शहर, लातूर ग्रामीण, धाराशीव आणि बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठका घेऊन विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर लातूर येथे मराठवाड्यातील नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार सोहळा व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात रमेश चेन्नीथला बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील, माजी मंत्री आ. अमित देशमुख, दिलीपराव देशमुख, लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण, जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार धिरज देशमुख, माजी मंत्री मधुकर चव्हाण, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष वजाहत मिर्झा, युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, लातूर ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव, धाराशिव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील आदी उपस्थित होते. या सोहळ्याच्या अगोदर सर्व नेत्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व त्यानंतर व्यासपीठावर येताच सर्व नेत्यांनी शंखनाद केला.