Congress Ramesh Chennithala News: भाजपा सरकारच्या विरोधात निर्भीडपणे उभे राहणाऱ्या काँग्रेसच्या देशभरातील नेत्यांवर मोदी सरकार कारवाई करत आहे. काँग्रेस नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने ईडीची कारवाई करण्यात आली असून त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. याआधीही ईडीने सोनिया गांधी व राहुल गांधी यांची चौकशी केली आहे. काँग्रेस पक्ष ईडी, सीबीआयच्या कारवायांना घाबरत नाही. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता एकजूट होऊन या कारवाईचा निषेध करेल, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.
नॅशनल हेरॉल्डशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात ईडीने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इतरांवर आरोपपत्र दाखल केले आहे. विशेष न्यायाधीश विशाल गोगने यांनी ९ एप्रिल रोजी दाखल आरोपपत्रातील महत्त्वाच्या मुद्यांची पडताळणी करून सुनावणी २५ एप्रिल रोजी निश्चित केली. आरोपपत्रात काँग्रेस नेते सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांचीही नावे आरोपी म्हणून समाविष्ट आहेत. सुनावणीत ईडी व तपास अधिकाऱ्यांचे विशेष वकील न्यायालयाच्या अवलोकनार्थ केस डायरी सादर करतील. यावरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून, केंद्रातील भाजपा सरकारवर टीका करण्यात येत आहे.
दंगलीची निष्पक्षपातीपणे चौकशी करुन दोषींना शिक्षा केली पाहिजे
रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, जाती धर्माच्या नावावर सुरू असलेला भेदभाव थाबंवण्यासाठी काँग्रेसने सद्भावना यात्रा काढली असून अशा सद्भावना यात्रा राज्यभर काढल्या पाहिजेत. भाजपा जाती धर्माच्या नावाखाली भेदभाव करत आहे. नागपुरात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत असताना या शहरात हिंसाचार झाला त्याला जबाबदार कोण? मुख्यमंत्री तथा गृहमंत्री नागपूरचे आहेत तरीही त्यांना या घटनेची माहिती कशी मिळाली नाही? गुप्तचर विभागाने त्यांना माहिती दिली होती का? याचे उत्तर द्यावे लागेल आणि दंगलीची चाहुलच लागली नसेल तर हे गुप्तचर विभागाचे अपयश आहे. महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री यांनी या दंगलीची निष्पक्षपातीपणे चौकशी करुन दोषींना शिक्षा केली पाहिजे, असे रमेश चेन्नीथला म्हणाले.
दरम्यान, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, पुरोगामी विचाराने चालवणाऱ्या महाराष्ट्रात आग लावणारे लोक सत्तेत आहेत. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उकरून काढत राज्यात तेढ निर्माण करण्याचे काम केले. संविधानाची शपथ घेतलेले मंत्री जाती धर्माच्या नावाने वाद निर्माण करत आहेत. नागपूर हिंसाचार प्रकरणानंतर एका आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवून घर पाडले त्याप्रकरणी अधिकाऱ्यांना आता माफी मागावी लागली. सर्वोच्च न्यायालयाने महायुती सरकारचा नपुंसक सरकार असा उल्लेख केला हे लाजिरवाणे आहे असे वडेट्टीवार म्हणाले.