विशेष प्रतिनिधी/लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रपती पदाच्या १७ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्याची आ. रमेश कदम यांची विनंती विशेष जिल्हा न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच, विधिमंडळाच्या २४ जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सहभागी होण्याची विनंतीदेखील अमान्य केली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात राष्ट्रवादीचे निलंबित आमदार रमेश कदम हे मुख्य आरोपी असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. लोकप्रतिनिधी कायद्यात २००२ मध्ये केलेल्या दुरुस्ती बघता त्यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदानात सहभागी होता येणार नाही वा अधिवेशनासही उपस्थित राहता येणार नाही, अशी बाजू विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी मांडली. तसेच, या आधी दिल्ली उच्च न्यायालयाने एका प्रकरणात पुण्याचे तत्कालिन खासदार सुरेश कलमाडी यांनादेखील परवानगी नाकारली होती, असे नमूद केले. शिवाय, राष्ट्रपती पदाचे मतदान वा अधिवेशनातील उपस्थिती हे दोन्ही त्यांचे मुलभूत अधिकार नसून घटनात्मक अधिकार आहेत, असा युक्तिवाद चव्हाण यांनी केला. तो मान्य करीत न्यायाधीश ए.डी.तनखीवाले यांनी कदम यांचा विनंती अर्ज फेटाळला. कोर्टाने अर्ज फेटाळलाराष्ट्रपती पदाचे मतदान वा अधिवेशनातील उपस्थिती हे दोन्ही कदम यांचे मुलभूत अधिकार नाहीत, असा वकिलांचा युक्तिवाद मान्य करत जिल्हा न्यायालयाने विनंती अर्ज फेटाळला.
‘रमेश कदमला मतदानास मुभा नाही’
By admin | Published: July 05, 2017 5:03 AM