मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांचा मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सोलापूर जिल्ह्यातील आमदार रमेश कदम याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एस. गडकरी यांनी बुधवारी फेटाळला. रमेश कदम हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून येथील आर्थर रोड कारागृहात आहे. जामीन मिळावा यासाठी त्याने केलेला अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे आता त्याला सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागणार आहे. कदम या महामंडळाचा अध्यक्ष असताना अनेक घोटाळे झाले होते. आतापर्यंत या महामंडळातील ३२० कोटी रुपयांच्या घोटाळ्याची माहिती सीआयडीच्या हाती आली आहे. बुलडाणा, जालना, भंडारा, हिंगोली, परभणी व बीड या सहा ठिकाणी बँकांमधून महामंडळाचे तब्बल ५५ कोटी रुपये काढून घेण्यात आले होते. त्यापैकी चार ठिकाणच्या व्यवहारात रमेश कदम सामील असल्याचे उघड झाले असल्याचे सीआयडीचे म्हणणे आहे. सीआयडीच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी बाजू मांडली.हा घोटाळा ३८५ कोटी रुपयांचा असल्याची आकडेवारी लोकमतने मालिकेद्वारे दिली होती. २०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यांबाबतचे आरोपपत्र सीआयडीने आधीच सादर केले आहे. त्यानंतर १२० कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचे पुरवणी आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. (विशेष प्रतिनिधी)
रमेश कदमचा जामीन फेटाळला
By admin | Published: January 28, 2016 3:26 AM