मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांतील प्रमुख आरोपी महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांची १३५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश येथील विशेष सत्र न्यायालयाने आज दिले. हा घोटाळा लोकमतने उघडकीस आणला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात कदम हे या महामंडळाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी अनेक प्रकारचे घोटाळे केले. या प्रकरणात कदम यांच्यासह ११ जण अजूनही तुरुंगात आहेत. मात्र या घोटाळ्यात सामील असलेले तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक बावणे अजूनही फरार आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीआयडीने आरोपपत्र आधीच न्यायालयात दाखल केले आहे. विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश तनखीवाला यांनी आज कदम यांची १३५ कोटींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले. त्यात औरंगाबादजवळील शेतजमीन, बोरीवलीतील फ्लॅट, औरंगाबादमधील बंगला, पेडर रोड, मुंबई येथील भूखंड, माळशिरस तालुक्यातील (जि. सोलापूर) शेतजमीन, औरंगाबाद आणि मुंबईत आयसीआयसीआय बँकेतील रक्कम, मुंबईत कॅनरा बँक, बँक आॅफ महाराष्ट्र, अॅक्सिस बँक, सिटी को-आॅपरेटिव्ह बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, बँक आॅफ इंडिया, इंडियन बँकेच्या खात्यातील रक्कम आदींचा समावेश आहे. (विशेष प्रतिनिधी)त्या रकमेचे काय?राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या ३८ मतदारसंघांमध्ये २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी प्रत्येकी पाच कोटींचे वाटप साठे महामंडळामार्फत करण्यात आले. या रकमेत प्रचंड घोटाळे झाल्याचे सीआयडी चौकशीत आढळले होते. तथापि, त्याबाबत अद्याप कोणतीही कारवाई न करण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
रमेश कदम यांची संपत्ती जप्त करा
By admin | Published: March 11, 2017 4:20 AM