मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांचा उजवा हात मानला जाणारा जयेश जोशी याला उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात सीआयडीने अटक केली आहे. जयेश हा कदम यांचा पीए व साठे महामंडळाचा मुख्य कार्यकारी अधिकारी होता. तो दोन्ही ठिकाणचा पगार घेत असे. महामंडळाच्या निधीतून एक इनोव्हा कार त्याच्या नावावर घेण्यात आली होती. रमेश कदम यांनी महामंडळाचे अध्यक्ष असताना जवळपास ३९ गाड्यांची खैरात वाटली होती. त्यातीलच ही एक गाडी होती. त्याच्या काकाच्या नावे महामंडळाच्या तिजोरीतून एक अॅम्ब्युलन्स खरेदी करण्यात आली होती. ‘७२ तासांच्या आत अटक केली जाईल,’ अशी नोटीस सीआयडीने जयेश जोशीला तीन महिन्यांपूर्वी दिली होती. तेव्हापासून तो फरार झाला. तो काही तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सहलींचे आयोजन करतो. अशाच सहलींच्या नावाखाली तो मुंबईत परतलेला नव्हता. गुरुवारी त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याच्या चौकशीत घोटाळ्यांबाबत अनेक खुलासे होतील अशी सीआयडीला आशा आहे. महामंडळाचा पैसा कुठे याची बरीचशी माहिती त्याला असण्याची शक्यता आहे. (विशेष प्रतिनिधी)
रमेश कदमचा सहकारी जयेश जोशीला अटक
By admin | Published: March 17, 2016 12:53 AM