लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पोलीस शिवीगाळप्रकरण ताजे असतानाच रमेश कदमविरुद्ध नागपाडा पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वत:च्या बरॅकमधून दुसरीकडे जात असताना त्याला हटकल्याचा रागात कदमने पुन्हा तेथील पोलीस शिपायाला शिवीगाळ केली. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अण्णा भाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेला कदम हा भायखळा कारागृहात आहे. भायखळा कारागृहातील पोलीस शिपाई निशांत गायकवाड हे २ जून रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास कदमच्या बरॅकबाहेर तैनात होते. याचदरम्यान कदम हा स्वत:च्या बरॅकमध्ये जाण्याऐवजी दुसरीकडे जात होता. गायकवाड यांनी त्याला पुन्हा बरॅकमध्ये जाण्यास सांगितले. याचा राग आल्याने कदमने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ही बाब वरिष्ठांना समजताच त्यांनी कदमविरुद्ध नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी त्याच्यावर ३५३ आणि ३३२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही शिवीगाळ१८ मे रोजी जे. जे. रुग्णालयात नेत असताना त्याला नातेवाइकांना भेटू दिले नाही, म्हणून त्याने सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना शिवीगाळ केली होती. तो व्हिडीओ व्हायरल झाल्याने हे प्रकरण चर्चेत आले. यात कदमला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली होती.
रमेश कदमची दादागिरी सुरूच
By admin | Published: June 07, 2017 5:16 AM