- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नातेवाइकांना भेटू न दिल्याच्या रागात पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या रमेश कदमविरुद्ध नागपाडा पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिराने गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याविरुद्ध सरकारी नोकरास कर्तव्यापासून परावृत्त करण्यासह शिवीगाळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचा आमदार कदम हा भायखळा कारागृहात आहे. गुरुवारी सकाळी त्याला जे. जे. रुग्णालयात नेत असताना, त्याला नातेवाइकांना भेटण्यास अटकाव घातला. याच रागात त्याने तेथे कर्तव्यावर असलेले सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल होताच, पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश बजावले होते. त्यानुसार, पोलीस उपायुक्त अखिलेश सिंग यांनी चौकशी करत, हा अहवाल शुक्रवारी गुन्हे शाखेच्या सहपोलीस आयुक्तांकडे दिला. त्यांनी अहवालाची तातडीने दखल घेत दिलेल्या आदेशामुळे, शुक्रवारी रात्री उशिराने कदमविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कर्मचाऱ्यास कर्तव्यापासून परावृत्त करणे, शिवीगाळ करणे अशा स्वरूपाचे गुन्हे कदमवर दाखल करण्यात आले आहेत.फेब्रुवारी महिन्यातही कदम याने पीएसआय गौड यांना शिवीगाळ केली होती. मात्र, हे प्रकरण चर्चेत न आल्याने, फक्त डायरी नोंद करण्यात आली होती. तेव्हाही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होणे गरजेचे असतानाही, त्याकडे वरिष्ठांनीच दुर्लक्ष केल्यामुळे त्याची मुजोरी वाढल्याची संतप्त भावना कारागृहातील कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत असून त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे. तर या प्रकरणी नागपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.