ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 28 स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धुळे तालुक्यातील रामनगर गावात दिवाळी आनंदात साजरी होत आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पुढाकाराने गावात सौरदिवे बसविण्यात आले आहेत. यंदाची दिवाळी या सौरदिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघणार आहे. धुळे तालुक्यातील नगाव ग्रुप ग्रामपंचायतअंतर्गत दुर्गम भागात रामनगर हे गाव वसले आहे़ २० ते २२ घरांची वस्ती आणि गावाची लोकसंख्या ६० ते ७० एवढी. गावात कोणत्याही प्रकारचे विकासाचे काम झालेले नाही. या गावाला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने स्मार्ट व्हीलेज अंतर्गत दत्तक घेतले आणि विकासाला चालना मिळू लागली आहे. गावात दोन सौरदिवे बसविण्यात आले. दरवर्षी अंधारात साजरी होणारी दिवाळी यंदा प्रकाशाने उजळून निघणार आहे. रामनगरपासून प्रत्येक गावाकडे जाणारा रस्ता आजही कच्चा आहे. दैनंदिन संसारोपयोगी लागणारे साहित्य खरेदीसाठी गावकऱ्यांना पायपीट केल्याशिवाय पर्याय नाही. शिवाय विद्युत खांब असून नसल्यासारखे. त्यामुळे वीज पोहचलेली नाही़ अशा स्थितीत सौरदिव्यांचा लखलखाट गावात सायंकाळच्या वेळेस होऊ लागला आहे. दरम्यान, एरव्ही कायम दुर्लक्षित असलेले रामनगर आता प्रकाशझोतात येण्यास सुरुवात झाली आहे.>रामनगर गावात विद्युत खांब उभारूनदेखील वीज पोहोचली नसल्याची स्थिती आहे. आता सौर ऊर्जेचा लखलखाट झाल्यानंतर कुठे विद्युत खांबावर विद्युत डीपी बसविण्यात आलेली आहे. अद्यापपावेतो या ठिकाणी विजेचा प्रवाह सुरू होणे बाकी आहे.>आम्हाला रामनगर या गावात येऊन आज बरीच वर्षे झाली आहेत. विकास काय असतो हे आम्हाला आतापावेतो माहीत नव्हते. आता कुठे हळूहळू विकास आमच्यापर्यंत पोहचत असल्याने समाधान वाटत आहे. अजून बऱ्याच बाबी गावात होतील, अशा शब्दात नवसाबाई मोरे (७३) आणि सावित्रीबाई वानखेडे (८१) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली़.
रामनगरची दिवाळी यंदा प्रकाशमय!
By admin | Published: October 28, 2016 5:33 PM