ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ)चे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद मुंबईत दाखल झाले आहेत. रामनाथ कोविंद आज एका दिवसाच्या मुंबई दौ-यावर आहेत. मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रामनाथ गोविंद यांचं स्वागत केलं. यानंतर रामनाथ कोविंद मरिन ड्राईव्ह येथील गरवारे क्लबमध्ये दाखल झाले असून त्याठिकाणी ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं. गरवारे क्लबमध्ये शिवसेनेचे आमदारदेखील उपस्थित आहेत.
गरवारे क्लबमध्ये आयोजित मेळाव्यात रामनाथ कोविंद महाराष्ट्रातील रालोआचे खासदार आणि आमदारांना संबोधित करणार आहेत.
आणखी वाचा
रामनाथ कोविंद यांच्याविरोधात विरोधी पक्षांतर्फे काँग्रेस नेत्या मीरा कुमार यांना राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढविण्याची उमेदवारी देण्यात आली आहे. पण अजूनही मीरा कुमार या निवडणुकीत विजयापासून दूर आहेत. पण याउलट एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातो आहे. कोविंद यांच्या खात्यात निवडणुकीच्या आधीच एनडीए आणि इतर पक्षांकडून मिळणारी 63.1 टक्के मत जमा आहेत. रामनाथ कोविंद यांना एनडीएच्या 48.9 टक्के मतांचा पाठिंबा आहे. तर जदयूच्या 1.91 टक्के, अण्णाद्रमुखच्या 5.39 टक्के, बिजू जनता दलाच्या 2.99 टक्के , तेलंगणा राष्ट्रसमितीच्या 2 टक्के , वायएसआरसीपीच्या 1.53 टक्के आणि आयएनएलडी या पक्षाच्या 0.38 टक्के मतांचा पाठिंबा रामनाथ कोविंद यांना मिळाला आहे. एकुण मिळून 63.1 टक्के मतांनी रामनाथ कोविंद यांचं पारडं जड आहे. म्हणूनच राष्ट्रपति पद त्यांच्याकडेच जाणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपाकडून जेव्हा बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचं नाव राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलं तेव्हा भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेची भूमिका निश्चित नव्हती. दलित मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी रामनाथ कोविंद यांचं नावं पुढे केलं जातं आहे, असा आरोप शिवसेनेने केला होता. पण त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दर्शविला. शिवसेनेची 2.34 टक्के मतं रामनाथ कोविंद यांना मिळणार आहेत.