सातारा : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने सोमवारी मध्यरात्री त्यांना पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दिवाळीच्या निमित्ताने रामराजे यांनी उदयनराजे यासह अनेक मान्यवरांच्या शुभेच्छा सोमवारी फलटणमध्ये स्वीकारल्या होत्या. साताऱ्यात झालेल्या जिल्हा बँकेच्या बैठकीसाठी देखील रामराजे उपस्थित होते. त्यानंतर रात्री अचानकपणे ताप वाढल्याने त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अस्वस्थतेमुळे उपचारासाठी दाखल केल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
सध्या सेनापती बापट रस्त्यावरील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ताप वाढल्याने रामराजे यांना अस्वस्थ वाटू लागले होते. मंगळवारी सकाळपर्यंत रामराजेंना बरे वाटू लागले असून सायंकाळपर्यंत घरी सोडतील, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
साेमवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी फलटण येथे जाऊन रामराजे नाईक निंबाळकर यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी दाेघांमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनुषंगाने गोपनीय बैठक झाली हाेती.
दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचे उमेदवार ठरविण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. मंगळवारी होणाऱ्या या बैठकीत अंतिम निर्णय होईल, जागावाटप देखील करायचे आहे. याबाबतचा निर्णय घेण्यात येणार होता; परंतु रामराजे हॉस्पिटलमध्ये असल्याने या बैठकीत निर्णय होईल का नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे.