"...तर आपल्याला 'तुतारी' वाजवायला किती वेळ लागतोय"; अजित पवारांना पुन्हा धक्का?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 01:46 PM2024-09-02T13:46:17+5:302024-09-02T13:48:41+5:30
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीच्या राजकारणाला वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांनी तिकीटासाठी हालचाली सुरू केल्यात.
सातारा - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. त्यातच अजित पवार गटाचे आमदार रामराजे निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त करत महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत दिलेत. रणजितसिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्यासोबतच्या संघर्षातून रामराजे निंबाळकर यांनी हे विधान केले आहे.
भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्याविरोधातील तक्रारीची भाजपाने दखल घ्यावी अशी मागणी रामराजेंनी केली आहे. साताऱ्यात कार्यकर्त्यांसमोर रामराजे निंबाळकर बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, आपली काय भारतीय जनता पार्टीसोबत भांडणं आहेत का? तर नाही, आपण हिंदुत्व मुसलमान करतो का?, आपण गाई कापतो त्याला प्रोटेक्शन देतो का? आपली फक्त तक्रार रणजिंतसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे सहकारी हे गल्लोगल्ली दहशत करतात. त्यांच्या दहशतीला आमचा विरोध आहे. त्याला भाजपाने साथ देऊ नये एवढीच खरी आपली तक्रार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच याबाबत वरिष्ठांना सांगून बघू, तुम्ही तयारीने या. महिलांना येऊ द्या. आपण एक तास वेगळा कार्यक्रम घेऊ आणि विषय संपवून टाकू, जरी उद्या काही फरक झाला नाही तर आपल्याला तुतारी वाजवायला किती वेळ लागतोय. आता अजून काय बोलायचं राहिलंय का? असं सांगत रामराजे नाईक निंबाळकरांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेण्याचेही संकेत दिले आहेत. त्यामुळे रामराजे निंबाळकर हे सध्या समरजितसिंह घाटगे, हर्षवर्धन पाटील यांच्या रांगेत आहेत का असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
महायुतीतील कोणते नेते पक्षांतराच्या वाटेवर?
सांगोला मतदारसंघातून शिवसेनेचे शहाजी पाटील यांना पुन्हा उमेदवारीची शक्यता असल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात गेलेले अभिजीत पाटील हे पुन्हा शरद पवारांकडे येऊ शकतात. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेले दीपक साळुंखे हेदेखील सांगोल्यातून इच्छुक आहेत त्यामुळे ते तुतारी चिन्हावरही उभे राहू शकतात.
सातारा जिल्ह्यातील वाई खंडाळ्याचे भाजपा नेते मदन भोसले यांनी नुकतीच जयंत पाटील यांची भेट घेतली. याठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असलेले मकरंद पाटील यांच्याविरोधात मदन भोसले तुतारी हातात घेतील अशी चर्चा आहे. त्याशिवाय रामराजे निंबाळकर आणि दीपक चव्हाण हे महायुतीसोबत आहेत मात्र लोकसभा निवडणुकीत अप्रत्यक्षपणे त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मदत केली असं बोललं जाते. त्यामुळे विधानसभेलाही त्यांनी तुतारी हातात घेतली तर आश्चर्य वाटायला नको.