मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसे राजकीय वर्तुळातील घडामोडींना सुद्धा वेग येत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्षात जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षात ज्यांनी ज्यांनी शरद पवारांची साथ सोडली, तेही आता पुन्हा घरवापसी करण्याच्या विचारात आहेत. अनेक इच्छुकांनी शरद पवारांकडे तुतारी फुंकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कालच इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा केली. आता हर्षवर्धन पाटील यांच्या पाठोपाठ अजित पवारांच्या गटाचा आणखी एक नेता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वाटेवर आहे.
फलटणमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर हे घड्याळाची साथ सोडून तुतारी हाती घेणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. कार्यकर्ते जे म्हणतील तो निर्णय घेणार असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटले आहे. त्यासाठी ते फलटणमध्ये लवकरच मेळावा घेऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर आपली भूमिका जाहीर करणार आहेत.
काही दिवसांपूर्वी सोळशी येथील कार्यक्रमात अजित पवार यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांचे भाषण सुरु असताना विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेले रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या पक्षात जाण्याची चर्चा सुरु आहे. तसेच, फलटणमध्ये महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीत अंतर्गत वाद लोकसभेच्या वेळी दिसून आला होता. भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात लोकसभा निवडणुकीत शाब्दिक वार झाले होते.