Mallikarjun Reddy : भाजपचे रामटेकचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यावर मंगळवारी पक्षाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या घटक पक्षावर केलेल्या टीकेनंतर भाजपकडून मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यावर तब्बल सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे नव्हेत तर भाजपचे देवेंद्र फडणवीस हे आगामी काळात निवडणुकीनंतर मुख्यमंत्री हवेत, असं वक्तव्य मल्लिकार्जुन रेड्डी यांनी केलं होतं. तसेच मला फाशी दिली तरी चालेल पण आशिष जयस्वाल यांचे काम करणार नाही, असेही रेड्डी यांनी म्हटलं होतं. पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर रेड्डी यांनी आता पक्षाविरुद्ध ठोकला शड्डू ठोकला आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षाची शिस्त मोडून पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत रेड्डींवर ही कारवाई करण्यात आलीय. नागपूर दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेकमधून आमदार आशिष जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर जयस्वाल यांच्या उमेदवारीला विरोध करत मल्लिकार्जुन रेड्डी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबाबत वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मल्लिकार्जून रेड्डी यांची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातून हकालपट्टी केली. भाजपाचा नेता-कार्यकर्ता महायुतीविरोधात बोलला, तर कठोर कारवाई केली जाईल, असे बावनकुळे रेड्डींवरील कारवाईनंतर म्हणाले.
पक्षातून हकालपट्टी केल्यानंतरही मल्लिकार्जुन रेड्डी यांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. आता कॉम्प्रोमाइज नाही म्हणत मल्लिकार्जुन रेड्डी यांनी बंडखोरी करण्याचे संकेत दिले आहेत. "आता रामबाण निघाला आहे, आता तो थांबणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या निकालातून हे स्पष्ट होईल. मी कोणत्याही स्थितीत कॉम्प्रमाइज करणार नाही. मी कॉम्प्रमाईज करणारा नाही. २० वर्षांपासून आशिष जयस्वाल कोणाची तरी मदत घेऊन निवडणूक जिंकत आला आहे. त्याच्यामुळे रामटेकमध्ये भाजप संपत चालली आहे," असं मल्लिकार्जुन रेड्डी यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले मल्लिकार्जुन रेड्डी?
जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मल्लिकार्जून रेड्डींनी शिंदेंनाही लक्ष्य केले. "एकनाथ शिंदे हे ॲक्सिडेंटल मुख्यमंत्री आहेत. त्यांना आता आम्हाला मुख्यमंत्री करायचं नाही. भाजपाचा मुख्यमंत्री हवा आहे. मला फाशी दिली तरी चालेल पण आशिष जयस्वाल यांचं रामटेकमध्ये काम करणार नाही," असं रेड्डी यांनी म्हटलं होतं.