मोहन भोयर,
तुमसर (भंडारा)- स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतर बहुप्रतिक्षित रामटेक-तुमसर टाऊन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला हिरवी झेंडी मिळाली आहे. यासाठी ६५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा रेल्वे मार्ग तिरोडी-कटंगी-बालाघाट मार्गाला जोडण्याचा रेल्वेचा प्रस्ताव आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी तुमसर रोड ते तिरोडी दरम्यान रेल्वे ट्रॅक घातले होते. मँगनिज धातूची ने-आण करण्याकरिता त्यांनी हा ट्रॅक घातला होता. आजही या ट्रॅकवरून मँगनीजसह प्रवासी गाड्या धावतात. मध्यप्रदेशातील तिरोडीपर्यंतच हा रेल्वे मार्ग आहे. लवकरच सर्वेच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती रेल्वे सूत्राने दिली.एका आठवड्यापूर्वी नागपूर विभागीय रेल्वे महाव्यवस्थापक अजित अग्रवाल यांनी निरीक्षण दौरा केला. मॉईलकडून दरवर्षी रेल्वेला मोठा महसूल प्राप्त होतो. तुमसर रोड-तिरोडी हा एकेरी रेल्वे मार्ग आहे. घनदाट जंगलातून हा मार्ग जातो. रामटेक-तुमसर टाऊन नवीन रेल्वे मार्ग तयार होण्यापूर्वी हा रेल्वे मार्ग दुहेरी करण्याचा प्रस्ताव आहे. याकरिता राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. रामटेक-गोंदिया राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याकरिता हालचाली सुरू असून चौपदरीकरणाचे सर्वेक्षण सुरू झाले आहे.हा मार्ग तयार झाल्यावर या परिसराचा कायापालट होण्यास मोठी मदत होईल. तुमसर टाऊन येथे मोठे रेल्वेस्थानक तयार करण्याचा रेल्वेचा मानस आहे.>आता तुमसर टाऊन-तिरोडी रेल्वे मार्गाला अच्छे दिन प्राप्त होतील. हा रेल्वे मार्ग तयार करण्याकरिता केंद्र व राज्य शासनाने पुढाकार घ्यावा.-के.के. पंचबुद्धे, जि.प. सदस्य तथा सदस्य, रेल्वेस्थानक सल्लागार समिती देव्हाडी.