Ramtek, Maharashtra Assembly Election Results 2024 News : रामटेक विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील बंडखोरीचा जोरदार दणका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला रामटेक विधानसभा मतदारसंघात बसला. ठाकरेंच्या शिवसेनेने जोर लावून रामटेक विधानसभा मतदारसंघाची जागा घेतली होती. पण, ठाकरेंच्या उमेदवाराचा मानहाणीकारक पराभव झाला.
नागपूर ग्रामीणमधील रामटेक विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत कुरबुरी झाल्या होत्या. त्या कुरबुरींचा फटका निवडणूक निकालात बसला आहे. रामटेकची जागा काँग्रेस सोडण्यास तयार नव्हती. पण, ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्याने काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षानी बंडखोरी केली होती. त्यामुळे काँग्रेसची साथ ठाकरेंच्या उमेदवारा मिळाली नाही आणि मोठा दणका बसला आहे.
रामटेक विधानसभा मतदारसंघात ११ व्या फेरी अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आशिष जयस्वाल यांना ६१ हजार ९३४ मते मिळाली. तर महाविकास आघाडीचे उमेदवार उद्धवसेनेचे उमेदवार विशाल बारबटे हे प्रचंड पिछाडीवर गेले.
बारबटे ११व्या फेरीअखेर चौथ्या स्थानी फेकले गेले. आशिष जयस्वाल यांनी १० हजार ३३८ मताधिक्य घेतले. तर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांना ५१ हजार ५९६ मते मिळाली. मुळक दुसऱ्या स्थानी, तर तिसऱ्या स्थानी चंद्रपाल चौकसे हे आहेत. ११व्या फेरीअखेर विशाल बारबटे यांना २ हजार ४०६ मते मिळाली.
काँग्रेस-ठाकरेंच्या शिवसेनेचा संघर्षाचा मविआलाच फटका
रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षानीच बंडखोरी केल्याने ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार लढत देऊ शकेल का, याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. ठाकरेंच्या शिवसेनेने याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. केवळ जागा वाढवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून जागा घेतल्या गेल्याचा सूर काँग्रेसच्या नेत्यांनी खासगीत लावला होता.