ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २९ : रामजन्मभूमी-बाबरी मस्जिद हा वाद गेली अनेक वर्षे जटिल बनून राहिला आहे. त्याची सोडवणूक करण्यासाठी अमेरिका, पाकिस्तान, इराण, इराक, श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान अशा मुस्लिम राष्ट्रातील मुल्ला-मौलवींना अयोध्येमध्ये एकत्रित करुन चर्चा घडवून आणणार आहोत, असे प्रतिपादन रामजन्मभूमी शिलान्यासाचे अध्यक्ष व माजी खासदार रामविलास वेदांती यांनी केले.विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पालखी सोहळ्यानिमित्त वेदांती बोलत होते. यावेळी राज्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते, माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस. एन. पठाण, डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रतनलाल सोनग्रा आदी मान्यवर उपस्थित होते. वेदांती म्हणाले, ह्यह्यभारतातील हिंदू व मुस्लिम समाजामध्ये 1992 पासून एक तेढ निर्माण झाली आहे. रामजन्मभूमी व बाबरी मस्जिदीच्या जागेबद्दल वादविवाद चालू आहेत. आजपर्यंत त्यावर सर्वमान्य असा तोडगा निघालेला नाही. अशावेळी विश्वधर्मी श्रीराम मानवता भवनाची उभारणी करण्याची डॉ. कराड यांची योजना अतिशय उत्तम आहे. याबद्दलची योजना केंद्र शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम आम्ही करु.