मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मातोश्रीवर (Motoshree) जाऊन हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यावरून मातोश्री बाहेर जोरदार राडा रंगला आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. तरीही मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याच्या भूमिकेवर राणा दाम्पत्य ठाम आहे. दरम्यान, राणा दाम्पत्य कसे आहे ते अमरावतीकरांना, महाराष्ट्राला माहीत आहे. ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले आहेत. त्यांना कोणी गांभीर्याने घेऊ नये असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याच्या भूमिकेबाबत जयंत पाटील यांना विचारले. यावेळी ते म्हणाले "राणा दाम्पत्य कसे आहे ते अमरावतीकरांना, महाराष्ट्राला माहीत आहे. ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले आहेत. त्यांना कोणी गांभीर्याने घेऊ नये. निवडून आल्यानंतर त्यांनी लगेच बाजू बदलली आहे. त्याबद्दल मी काही बोलणार नाही."
याचबरोबर, मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ल्याच्या संदर्भात देखील जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी पाटील म्हणाले की, कोणाच्याही गाडीवर असा हल्ला करणे योग्य नाही. तो हल्ला कोणी केला, याबाबत तपास करणे गरजेचे असल्याचे जयंत पाटील म्हणाले. सिग्नलला गाडी उभी राहिल्यावर हल्ला करणे, त्यानंतर ती गाडी निघून जाणे हे सगळ जरा व्यवस्थित तपासले पाहिजे असे जयंत पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेची आज कोल्हापूरमध्ये संकल्प सभा होणार आहे. यासंदर्भात जयंत पाटील म्हणाले की, पक्षात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आम्ही परिसंवाद यात्रा काढली होती. ही यात्रा 14 हजार किलोमीटरचा प्रवास करुन आज कोल्हापूरमध्ये पोहोचत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज कोल्हापूरमध्ये संकल्प सभा होणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
हनुमान चालीसा पठण करण्याच्या भूमिकेवर राणा दाम्पत्य ठामहनुमान चालीसा पठणावरून सुरू झालेल्या वादात खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी उडी घेतली असून, आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हनुमान चालीस पठण करण्याचे आव्हान दिले आहे. यावरून मुंबईतील मातोश्री बाहेर जोरदार राडा रंगला आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत, तर मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याच्या भूमिकेवर राणा दाम्पत्य ठाम आहे.