मुंबई : तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकी न्यायालयाने परवानगी दिली. भारताचा हा मोठा विजय आहे. माझ्या माहितीनुसार पहिल्यांदाच अमेरिकी सरकार भारतीय तपास संस्थेच्या पुराव्यांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहिले, अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.
निकम पुढे म्हणाले की, डेव्हिड हेडली याने दहशतवादी हल्ल्यापूर्वी मुंबईला भेट दिली होती. त्याने लक्ष्य स्थळांना भेट देऊन त्या ठिकाणांचे फोटो पाकिस्तानात ‘’लष्कर- ए- तय्यबा’’ ला दिले होते. डेव्हिड हेडलीला मुंबईत इमिग्रेशन कार्यालय उघडण्याबाबत राणाने मार्गदर्शन केले होते. तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण हे एक मोठे यश आहे. कारण मी व केंद्र सरकारच्या तीन अधिकाऱ्यांनी इस्लामाबादला भेट दिली होती आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा गुन्हेगारी कट रचणाऱ्यांवर पाकिस्तान खटला चालवत आहे की, नाही हे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक होतो. पण, पाकिस्तानी अधिकारी आम्हाला पुरावे सादर करण्यास सांगत होते.
... पण कारवाई नाहीडेव्हिड हेडलीची चौकशी केल्यानंतर आम्ही संपूर्ण पुरावे दिले, पण पाकिस्तानने कारवाई केली नाही. मला वाटते की, तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाच्या आदेशामुळे गुन्हेगारी कटाची संपूर्ण कवाडे उघडण्यास अनेक प्रकारे मदत होईल. कारण तहव्वूर राणा पूर्वी पाकिस्तानात डॉक्टर म्हणून काम करत होता आणि तो काही काळ पाकिस्तानी सैन्यातही कार्यरत होता.