मुंबई : नवनिर्वाचित आमदारांना मतदारसंघात फिरताना आता लोकं विकास कामांबद्दल विचारणा करू लागले आहे. मात्र राज्यात सरकारचं अस्तित्वात नसल्याने या आमदारांची उत्तर देताना अडचण होत आहे. असेच काही तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यासोबत घडताना पाहायला मिळाले. मतदारसंघात रस्त्याच्या भूमिपूजनासाठी गेले असताना त्यांना एका तरुणाने सुशिक्षित बेरोजगारांचे काय असा प्रश्न विचारला. मात्र आपलं सरकार तर येऊ द्या असे म्हणत त्यांनी गावकऱ्यांसमोर भविष्यात केल्या जाणाऱ्या कामांचा पाडाच वाचवून दाखवला.
विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी व उमेदवारांनी मतदारांना विविध आश्वासने दिली होती. त्यामुळे निवडून आलेल्या आमदारांना लोकं दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत आहे. मात्र राज्यात सरकारच अस्तित्वात नसल्याने विकास कामे कशी करायची असा प्रश्न या आमदारांना पडला आहे. त्यामुळे मतदारसंघात फिरताना नागरिकांना काय उत्तर द्यावे असा प्रश्न या आमदारांना पडत आहे.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील हे सोमवारी आपल्या मतदारसंघातील धनगरवाडी येथे गावांतर्गत रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमाला गेले होते. त्यांचे भाषण सुरू असतानाच तिथे उपस्थित असलेल्या एका तरुणाने तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार हे काम नसल्याने दुसऱ्या जिल्ह्यात जात असल्याचा मुद्दा मांडला. तसेच त्यांना रोजगार देण्यासाठी काही ठोस पाऊले उचलली जातील का ? असा प्रश्न उपस्थित केला.
तर तरुणांने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राणा जगजीतसिंह म्हणाले की, आधी यासाठी आपले सरकार तर येऊ द्या. तसेच मतदारसंघात असलेला साखर कारखाना,खताचा कारखानात सुरू करण्याचे प्रयत्न आपण करणार आहे. त्याचबरोबर एमआयडीसीसाठी जमीन घेऊन विकसित करण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले असल्याचे म्हणत त्यांनी आश्वासनाचा पाऊस पाडला. मात्र तरुणाने विचारलेल्या बेरोजगारांच्या प्रश्नाने राणा जगजीतसिंह घायाळ झाल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.