लोकमत न्यूज नेटवर्कमंचर : मुळेवाडी (मंचर) येथे अवैधरीत्या चालणाऱ्या दारूच्या दुकानावर महिलांनी आज हल्लाबोल केला. रणरागिणी बनलेल्या महिलांनी दुकानाचे टाळे हातोडा मारून तोडून टाकले. दुकानासमोर भजन आंदोलन करत दारूबंदी झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या. शंभराहून अधिक महिलांनी दारूबंदीसाठी आक्रमक होऊन तीन तास आंदोलन केले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन पंचनामा करत तीनही दुकाने सिल केली. त्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.महिनाभरापासून अवैधरीत्या हे दुकान सुरू झालेले होते. तळीराम दारू घेऊन तेथेच टेबलावर बसून दारू पीत असत. त्याचा त्रास या भागातील नागरिकांना होऊ लागला. परिसरातील तरुण व्यसनांच्या आहारी गेल्याचे लक्षात आल्याने महिला संतप्त झाल्या.मुळेवाडी परिसरातील महिलांनी सरपंच दत्ता गांजाळे यांची भेट घेतली. संबंधित दुकानचालकाने कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे गांजाळे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर महिलांनी दुकानावर मोर्चा नेला. स्वत: सरपंचांनी दुकानाला टाळे ठोकले. मात्र पुन्हा दुकानदाराने दारूविक्री सुरू केली. त्यामुळे परिसरात संतापाची लाट पसरली. संतप्त महिलांनी मंगळवारी सायंकाळी या दुकानावर हल्लाबोल केला. शंभराहून अधिक महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. मुलींचीही संख्या लक्षणीय होती.
दारू दुकानावर रणरागिणींचा हल्लाबोल
By admin | Published: June 07, 2017 1:32 AM