विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपातीलच काही नेत्यांचा विरोध असल्याने माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश अडला असल्याची चर्चा आहे.राणेंनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले. तेव्हापासून त्यांनी भाजपावर टीकेची एकही संधी सोडलेली नाही. त्यांच्यावर भ्रष्टाचारापासून अनेक आरोप भाजपाचे नेते करीत आले आहेत. असे असताना त्यांना भाजपात घेतले तर त्यातून पक्षजनांमध्ये काय संदेश जाईल, असा सवााल आता केला जात आहे. राणेंना पक्षात घेण्यास विरोध असलेल्या नेत्यांनीच काही महिन्यांपूर्वी त्यांचा प्रवेश रोखून धरण्यात यश मिळविले होते. ‘काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांविरुद्ध आरोप करीत आम्ही सत्तेत आलो, त्यांनाच पक्षात घेतले तर ‘पार्टी विथ द डिफरन्स’चे काय होईल, असा सवाल या नेत्यांनी पक्षनेतृत्वाकडे केला आहे, असे सूत्रांनी सांगितले.आघाडी सरकारच्या काळात मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे धसास लावणारे नेते होते तसे काही ठिकाणी मंत्र्यांशी दोस्ती ठेवणारेही नेते भाजपा व शिवसेनेत होते आणि त्याबद्दल वेळोवेळी राजकीय चर्चादेखील होत आली. तथापि, काँग्रेस-राष्ट्रवादीशी कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेता कामा नये, आपण त्यांना विरोध करण्याबाबत ठामच राहिले पाहिजे, असे मानणारे नेतेही भाजपात होते आणि आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यात प्रमुख मानले जात होते.राणे उद्या भाजपात आले तर त्यांचे स्थान काय असेल, आज प्रदेश भाजपात प्रस्थापित असलेल्या नेत्यांच्या रांगेत ते कोणाचे स्थान घेतील, विशेषत: मराठा नेता म्हणून त्यांना समोर करण्यात आले तर पक्षात सध्या असलेल्या वरिष्ठ मराठा नेत्यांना ते स्वीकारार्ह असेल काय हे मुद्देही पक्षांतर्गत चर्चेत आहेत.राणेंच्या संभाव्य भाजपा प्रवेशाबाबत कोकणमधील भाजपाच्या नेते, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याचे म्हटले जाते. काही स्थानिक नेत्यांनी प्रदेश नेतृत्वाकडे तशी भावनाही व्यक्त केल्याची माहिती आहे.
राणेंच्या भाजपा प्रवेशाबाबत कोकणमधील भाजपाच्या नेते, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 4:43 AM