विशेष प्रतिनिधी मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना प्रवेश देण्यास भाजपा श्रेष्ठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल असले तरी राणे यांच्या दोन्ही पुत्रांच्या राजकीय भवितव्याविषयी कोणतेही ठोस आश्वासन अद्याप दिले न गेल्याने राणेंचा भाजपा प्रवेश अडल्याचे म्हटले जाते.राणे यांचे पुत्र निलेश हे लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत पराभूत झाले होते तर दुसरे पुत्र नितेश हे विधानसभेवर निवडून गेले. स्वत: राणे यांचा पराभव झाला होता. राणे यांना राज्यसभेवर पाठविले जाईल आणि निलेश यांना विधान परिषदेवर पाठवून नितेश यांना राज्यमंत्री पद दिले जाईल,अशी अटकळ लावली जात आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी या संदर्भात कोणतीही चर्चा काल झाली नाही आणि तसा फॉर्म्यूलाही ठरलेला नाही, असे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी आज लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.सूत्रांनी असेही सांगितले की राणे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यास भाजपाने अनुकूलता दर्शविली आहे. शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आलेले राणे यांनी अनेकदा काँग्रेसच्या नेत्यांवरच टीकास्त्र सोडले आहे. भाजपात तसे करता येत नसते अशी सूचक समज त्यांना देण्यात आली आहे. अशीही माहिती आहे की, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापेक्षाही राणेंना भाजपात घेण्याविषयी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील जास्त उत्सुक आहेत. त्यामुळे राणे यांचा प्रवेश हा मुख्यमंत्र्यांच्या नव्हे तर पाटील यांच्या माध्यमातून होत असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी आज राणे यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राणेंच्या निवासस्थानी गेले होते. राणे यांनी गेले काही दिवस काँग्रेसच्या मंचावर जाण्याचे टाळले आहे. सोलापुरातील काँग्रेसच्या मेळाव्याला रविवारी त्यांनी पाठ दाखविली होती.
पुत्रांमुळे राणेंचा भाजपाप्रवेश रखडला, प्रवेश फॉर्म्युला ठरला नाही; दानवेंची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 5:57 AM