ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 13 - संजय दत्तच्या आगामी बायोपिकमध्ये रणबीर कपूर "खलनायक" संजूबाबाची भूमिका साकारत असल्याचे तुम्हाला माहिती असेलच. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. "मुन्नाभाई सिरीज", "३ इडियट्स", पीके फेम दिग्दर्शक राजकुमार हिराणी हा चित्रपट दिग्दर्शित करीत आहेत. या चित्रपटात संजय दत्त सारखं दिसण्यासाठी रणबीर कपूर प्रचंड मेहनत घेत आहे. मंगळवारी लोकमतचा महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर पुरस्कार सोहळा पार पडला. अभिनेता रणबीर कपूरला लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार-2017 मधील आऊटस्टॅडिंग एन्टरटेनर ऑफ द इयर (पुरुष) कॅटेगरीतील पुरस्काराने गौरविण्यात आले. अनुज पोद्दार बिझनेस हेड कलर्स मराठी यांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच खास क्षणाचं औचित्य साधत लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी रणबीर कपूरची मुलाखत घेतली. रणबीरला त्यांनी यावेळी विविध प्रश्न विचारले. त्याची रणबीरनंही दिलखुलास उत्तरंसुद्धा दिली. मुलाखत सुरु असताना ऋषी दर्डा यांनी संजय दत्तवरील चित्रपटाच्या विषयाला हात घातला. यावेळी रणबीरला संजय दत्तचा वॉक करुन दाखवण्याची आणि त्याचा एखादा डायलॉग बोलून दाखवण्यासही सांगितले. संजय दत्तच्या चालण्याच्या शैलीचे सगळेच फॅन आहेत. त्यामुळे रणबीरनं मोठ्या खिलाडूवृत्तीने संजूबाबाचा प्रसिद्ध वॉक करुन उपस्थितांची मनं जिंकली. रणबीर यावरच थांबला नाही तर संजय दत्त बोलतो कसा हे सुद्धा दाखवून दिलं. संजय दत्तसारखा वॉक करता करता त्यानं संजय दत्तच्या खास स्टाईलमध्ये कसं काय येरवडा असा डायलॉग म्हटला. त्यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्याचे कौतुक केले.
मंगळवारी लोकमतचा महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर हा सोहळा पार पडला या सोहळ्यात दिग्गजांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. युपीएएल प्रस्तुत लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात आपल्या कार्याची छाप पाडणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्तिमत्त्वांना गौरवण्यात आले. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर च्या चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ह्यपायाभूत सेवाह्ण, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" आणि वैद्यकीय यामधील 14 पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.