सावंतवाडी - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची उत्पतीच मुळात गुंडगिरीतून झाली आहे. माझ्या कुटुंबावर साधी एकही तक्रार नाही. मग आरोपांमध्ये काय तथ्य आहे ते त्यांनी जनतेसमोर येऊन सांगावे. राणेंच्या विरोधात चौकशी सुरू आहे. म्हणूनच त्यांनी पक्ष बदलला, असा घणाघाती आरोप राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला. ते सावंतवाडी येथे बोलत होते. यावेळी मंत्री केसरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. पण आपण यापूर्वीच जाहीर केले आहे की ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रकियेत सहभागी होणार नाही. त्यामुळे मी प्रचारासाठी कुठेही गेलो नाही. पण ग्रामपंचायती कोणत्याही पक्षाच्या आल्या तरी विकास थांबणार नाही. तसेच त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ज्यांच्या राजकारणाची सुरुवात टोळीतून झाली, त्यांनी आमच्यावर आरोप करावेत हे दुर्दैव आहे. माझ्यावर ते स्मगलिंगचा आरोप करतात. त्यांनी कोणत्या पोलीस ठाण्यात एक तरी आमच्या कुटुंबा विरोधात तक्रार असल्यास सांगावे. आम्ही खोटे आरोप सहन करणार नाही. राणे यांनी मुळातच पक्ष बदलला आहे, तो त्यांच्यामागे लागलेल्या अनेक चौकशींमुळे. आता उच्च न्यायालयातही त्यांच्याविरोधात याचिका दाखल झाली आहे. न्यायालय काय तो निकाल देईलच. पण भाजपने आपल्या पक्षात का घेतले नाही? याचाही विचार राणे यांनी करावा, असा टोलाही मंत्री केसरकर यांनी यावेळी हाणला.
नारायण राणेंची उत्पत्तीच मुळात गुंडगिरीतून, दिपक केसरकरांचं राणेंना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2017 10:38 AM