ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - वाढत्या असहिष्णूतेमुळे देश सोडून जाण्याचे वक्तव्य करणा-या अभिनेता आमिर खानवर सर्व स्तरातूंन टीका होत असतानाच शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही 'सामना'च्या अग्रलेखातून त्याला 'रणछोडदास' असं संबोधत त्याच्यावर टीकास्त्र सोडले आहे. आमिरला कोणत्या कारणांमुळे देशातून पळून जावेसे वाटले व या बाईलबुद्ध्याने ‘मातृभूमीस’ टांग मारून फिल्मी बायकोचे सांगणे इतके मनावर का घ्यावे असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच 'देशात जर इतकी घुसमट होत असेल तर पुढील चित्रपट इतर देशात प्रदर्शित करावे असा सल्लाही देण्यात आला आहे.
देश सोडून जाण्याची भाषा बेईमानीची आहे, या देशाने जे वैभव दिले ते सर्व इकडेच ठेवा आणि मग देश सोडून जाण्याची भाषा खुशाल करा. हिंदुस्थान हा देश राहण्यालायक वाटत नसेल तर हे ‘इडियट रणछोडदास’ कोणत्या देशात जाणार आहेत असा सवाल उद्धव यांनी विचारला आहे. आमिरच्या या वक्तव्यामुळे त्याचा देशभक्तीचा फुगा फुटला असून ज्यांना हा देश आपला वाटत नसले त्यांनी उगाच देशभक्तीच्या व ‘सत्यमेव जयते’च्या वल्गना करू नयेत अशी घणाघाती टीका अग्रलेखात करण्यात आली आहे. हिंदुस्थानात मुस्लिम जेवढे सुरक्षित आहेत तेवढे जगातील इस्लामी देशांमध्येही नाहीत, असे सांगत हा देश सहिष्णू असल्याचे लेखात म्हटले आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात :
- अधूनमधून हिंदी सिनेमातील ‘खान’ मंडळींना देश सोडून जायची उबळ येत असते. अशी उबळ काही वर्षांपूर्वी शाहरूख खानला आली होती व त्याच आजाराचे डेंग्यू मच्छर आमीर खानलाही चावल्याने देश सोडावा काय? या विचारात तो गुरफटला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या दुसर्या बायकोने भीतीपोटी मुलाबाळांसह देश सोडून जाण्याचा विचार केला होता. आमीरला कोणत्या कारणांमुळे देशातून पळून जावेसे वाटले व या बाईलबुद्ध्याने ‘मातृभूमीस’ टांग मारून फिल्मी बायकोचे सांगणे इतके मनावर का घ्यावे हे त्याचे त्यालाच माहीत. आमीर खानच्या या वक्तव्याने त्याच्या ‘सत्यमेव जयते’चा मुखवटा साफ गळून पडला आहे व देशभक्तीचा फुगा फुटला आहे. याच देशाने आमीर खानसारख्यांना लोकप्रियता, प्रतिष्ठा व वैभव मिळवून दिले. राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले. ‘पीके’सारख्या चित्रपटात हिंदू धर्मावर यथेच्छ टीका व देवांवर ‘टिपण्या’ असूनही हा चित्रपट शेकडो कोटींचा धंदा आमीरला देऊन गेला तो काय हा देश असहिष्णू आहे म्हणून?
- मंडळींचे देशासाठी असे काही खास योगदान म्हणाल तर तेसुद्धा नाही. गल्लाभरू चित्रपट बनवून पैसा ओढायचा व तोंडास येईल ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली बरळायचे. पुन्हा हे बरळायचे स्वातंत्र्य या मंडळींना जरा जास्तच मिळाले आहे. अमिताभ बच्चन, देव आनंद, दिलीपकुमार, फिरोज खान, सलीम खान, इतकेच कशाला? सलमान खानसारख्या लोकांना कधी भीती वाटली नाही व देश सोडून पळून जावे असे वाटले नाही. दिलीपकुमार अर्थात युसूफ खान यांचे जन्मस्थळ ‘पेशावर’ म्हणजे पाकिस्तानचे. त्यांना आपल्या जन्मस्थानाविषयी ओढ होती, पण देश संकटात आहे म्हणून पळून जाण्याचा विचारही त्यांच्या मनाला कधी शिवला नाही.
- हिंदुस्थानात मुस्लिम जेवढे सुरक्षित आहेत तेवढे जगातील इस्लामी देशांमध्येही नाहीत.जपान, चीनमध्ये तर मुसलमानांना मशीद बांधण्याची, दाढी राखण्याचीही परवानगी नाही. हिंदुस्थानातील मुस्लिम त्यांचा धर्म, चालीरीती, प्रथा-परंपरा बिनबोभाटपणे पाळत आहेत. येथील धर्मांध मुस्लिमांचेही सर्व चोचले ‘निधर्मी’ राज्यकर्त्यांनी आजवर पुरविले आहेत. तरीही आमीरच्या बायकोला हा देश ‘असहिष्णू’ वाटत आहे. पुन्हा आज तथाकथित असहिष्णुतेवर पोपटपंची करणार्या आमीर खान महाशयांना हिंदुस्थानी घटना पायदळी तुडविणार्या, आझाद मैदानातील ‘अमर जवान शिल्पा’ची विटंबना करून तोडफोड करणार्या धर्मांध मुस्लिमांना सहिष्णुतेचे डोस पाजावेत असे का वाटले नाही?
- आमीर खान व त्याच्या बायकोने एकदा कश्मीर खोर्यांतील आपल्या जवानांचे युद्ध जाऊन पाहावे. पाकड्यांशी लढताना जवान शहीद होतात म्हणून त्यांच्या निराधार कुटुंबीयांनी देशातून पळून जावे काय? की संकटांशी सामना करण्यापेक्षा रणावरून पळून जाण्याचा विचार सैनिकांनी करावा? गेल्याच आठवड्यात शहीद झालेले कर्नल संतोष महाडिक यांच्या वीरपत्नीने देश सोडून जाण्याचा विचार सोडा, त्याऐवजी आपल्या दोन्ही मुलांनाही आपण देशरक्षणासाठी सैन्यातच पाठवू असा संकल्प बोलून दाखवला. कुठे आमीर खान, त्याची बायको आणि कुठे हुतात्मा संतोष महाडिक यांच्या धीरोदात्त पत्नी?