ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. 14 : काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची नारायण राणे यांची भूमिका ही स्वतःबरोबरच आपल्या मुलांच्या हितासाठीच आहे. प्रत्येकवेळी ते आपला स्वार्थ साधत असतात. सत्तेशिवाय ते क्षणभरही राहुच शकत नाहीत हे अनेकवेळा स्पष्ट झाले आहे. अशी टिका करतानाच नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशामुळे शिवसेनेला काहीही फरक पड़णार नाही. असे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले. येथील विजय भवनमध्ये शुक्रवारी आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख राजू राठोड, माजी नगरसेवक भुषण परुळेकर , भास्कर राणे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार नाईक म्हणाले, नारायण राणे यांनी काँग्रेसच्या माध्यमातून आठ वर्षे सत्ता भोगली आहे. तर त्यांच्या मुलांना खासदार , आमदार बनविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत ते दोन वेळा पराभूत होऊन देखील त्यानी हट्टाने विधान परिषदेची आमदारकी मागून घेतली आहे. तसेच विधानपरिषद गटनेते पदही मिळविले आहे. मात्र, काँग्रेसच्या माध्यमातून एवढे सर्व मिळून सुध्दा आता ते पक्ष सोडून भाजपमध्ये जाण्याचा विचार करीत आहेत. हा केवळ त्यांचा स्वार्थच आहे.जनतेशी त्यांना काही देणेघेणे राहिलेले नाही. सत्तेशिवाय नारायण राणे क्षणभरही राहु शकत नाहीत. त्यासाठीच त्यांचे हे पक्ष बदलाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांना इडी मार्फत चौकशीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. आपल्या पाठीमागचा हा चौकशीचा ससेमिरा लवकर थांबावा यासाठी सत्ताधारी पक्षात जाण्याचा त्यांचा विचार सुरु आहे. त्यासाठीच त्यांची सध्या सर्व धावपळ सुरु आहे. 12 वर्षापूर्वी त्यानी शिवसेना सोडली त्यावेळीही राज ठाकरे व त्यांची चर्चा झाली होती. सन 2009 च्या निवडणुकीनंतर शिवसेना सत्तेत येणार नाही.हे स्पष्ट झाल्यानेच त्यानी त्यावेळी शिवसेना सोडली होती. आता आगामी काळात पुन्हा काँग्रेस लवकर सत्तेत येणार नाही हे त्यांना समजल्यानेच त्यांची काँग्रेस पक्ष सोडण्याची हालचाल सुरु झाली आहे. मात्र, अहमदाबाद येथील घटनेनंतर त्यांची ही भूमिका जनतेसमोर उघड झाली आहे.त्यामुळे भविष्यात जे लोक काँग्रेसबरोबर रहातील त्यानी काँग्रेसमध्ये राणेंवर अन्याय झाला असे समजू नये. याउलट त्यानी काँग्रेसमध्येच रहावे. तर राणेंची साथ सोडून यापूर्वीच भाजप मध्ये प्रवेश केला आहे, त्यानीहि आपल्या भूमिकेवर ठाम रहात राणे विरोध कायम ठेवावा.हेच जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टीने योग्य आहे आणि ही सिंधुदुर्गवासियांची इच्छा आहे.> राणेंच्या भाजप मध्ये जाण्याने शिवसेनेला काही फरक पड़त नाही. उलट राणे विरोधात असल्याने शिवसेना वाढत आहे. शिवसेनेचे खासदार, आमदार निवडून आले असून सत्तेतही शिवसेना आली आहे. अनेक सत्तास्थाने शिवसेनेच्या हातात आली आहेत.त्यामुळे यापुढेही शिवसेना सामान्य जनतेसाठी सर्व स्तरावर विकासाची भूमिका कायम लावून धरेल.वेळप्रसंगी संघर्षही करेल. असेही आमदार नाईक यांनी यावेळी सांगीतले
> "तो" विषय आपल्याकडे अद्याप आलेला नाही! काही दिवसांपूर्वी नारायण राणे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. याविषयी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले, " तो" विषय अद्याप आपल्याकडे आलेला नाही. त्यामुळे त्याविषयी कााही बोलण्यात अर्थ नाही.